दुरुस्तीच्या कामासाठी नेरळ फाटक बंद

। नेरळ । प्रतिनिधी ।

मुंबई-कर्जत-पुणे मेन लाईनवरील नेरळ येथील रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. याच काळात चिंचवली येथील रेल्वे फाटकदेखील दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आल्याने वाहन चालकांचा प्रवास दूरवरून सुरू आहे.

मध्य रेल्वेचे मेन लाईनवर रेल्वेकडून दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यात रेल्वे फाटकामध्ये असलेली जुनी खडी काढून त्यावर नवीन खडी टाकून पुन्हा तो परिसर मजबूत करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून सुरू आहे. नेरळ कर्जत दरम्यान एकच वेळी दोन रेल्वे फाटक येथे दुरुस्तीचे काम रेल्वेकडून सुरू आहे. त्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानक भागातील चिंचवली गावाजवळ असलेले फाटक क्रमांक 23 हे 28 मेपासून वाहतुकीसाठी बंद आहेत. 28 मे ते 31 मे या कालावधीत चिंचवली फाटक बंद आहे. त्यात भर नेरळ येथील प्रचंड रहदारी असलेले फाटक क्रमांक 21 हे रात्रीपासून बंद ठेवण्यात आले आहे. नेरळ फाटक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असून फाटक बंद झाल्यावर दोन तीन मिनिटात वाहनांची रांग किमान 500 मिटर लांबपर्यंत जात असते. या फाटकातून दुरुस्तीचे काम 28 मे पासून 2 जूनपर्यंत चालणार आहे. 2 जून रोजी सकाळी हे फाटक वाहनांसाठी सुरू होणार आहे.

या काळात वाहनांना आपल्या निश्‍चितस्थळी जाण्यासाठी नेरळ फाटक बंद असल्याने अन्य मार्गाने जावे लागणार आहे. त्यात दामत येथील फाटक 20 आणि आंबिवली येथील फाटक 22 यांचा वापर करावा लागणार आहे. मात्र, नेरळ फाटकपासून आंबिवली फाटक यातील रस्ते मार्गाचे अंतर हे किमान 8 किलोमीटर आहे तर, नेरळ फाटक येथून दामत फाटक हे तीन किलोमीटर अंतरावर आहे. नेरळ फाटक बंद असल्याने वाहनचालक यांना दामत किंवा आंबिवली फाटक येथून जावे लागत असल्याने मोठा फेरा मारावा लागत आहे. त्यात बाहेरून येणार्‍या वाहन चालक यांना नेरळ फाटक बंद असल्याची माहिती नसल्याने वाहनचालक यांना पुन्हा पर्यायी फाटक यांचा वापर करण्यासाठी परत जावे लागत आहे. त्यात बोर्ले येथून जाणारा पेशवाई रस्ता याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना कर्जतकडे जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

Exit mobile version