तीन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद; चालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब
| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे फाटक आहे. या रेल्वे फाटकाच्या दुरुस्तीचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरु असून वाहतुकीसाठी हे फाटक बंद आहे. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. दरम्यान, रेल्वे फाटकातील दुरुस्तीची कामे वेगाने सुरु असून शुक्रवारी (दि.9) फाटक वाहतुकीसाठी उघडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई-पुणे मार्गावरील नेरळ रेल्वे स्थानक ते भिवपुरी रोड रेल्वे फाटक येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक 21 हे 6 जानेवारीपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. नेरळ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेले हे फोटक नेरळ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारे फाटक आहे. या फाटकातून दररोज किमान 5 हजार वाहनांची ये-जा सुरु असते. त्यात अवजड वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे या फाटकातील रेल्वे मार्गिका आणि ट्रॅकमधील खडी खचण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे दरवेळी नेरळ स्थानकाजवळ असलेले हे रेल्वे फाटक दुरुस्तीसाठी बंद करावे लागते. दरम्यान, 6 जानेवारीपासून हे रेल्वे फाटक सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मात्र, हे फाटक बंद असल्याने वाहनांच्या येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यात वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. त्यासाठी नेरळ पूर्व भागातील वाहनचालकांना नेरळ पश्चिम भागात जाण्यासाठी आंबिवली येथील रेल्वे फाटक क्रमांक 22 किंवा दामत येथील रेल्वे फाटक क्रमांक 20 येथून जावे लागत आहे. त्यात या दोन्ही फाटकाकडे जाणारे रस्ते खड्डेमय बनले आहेत. त्यात या पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यासाठी इंधनाचा अतिरिक्त वापर होत आहे.
दरम्यान, या फाटकाचे काम प्रगतीपथावर असून या तीन दिवसांच्या काळात त्या ठिकाणी रुळाखालील खडी बदलण्याचे, पेव्हर ब्लॉक टाकण्याचे आणि रेल्वे मार्गिकेच्या बाजूला डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. तीन दिवसांच्या मुदतीत हे काम पुर्ण करण्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला होता. त्यामुळे आज (दि.9) हे फाटक बंद होऊन तीन दिवस पुर्ण होत आहेत. त्यामुळे आज हे फाटक पुर्ववत चालु करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास वाहनचालकांचा वेळ आणि आर्थिक भुर्दंड वाचेल.
