पाऊस तोंडावर तरी प्रशासन सुस्त; नेरळ गावासाठी मोठी समस्या
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात शहरीकरण झालेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये अनेक नाले आहेत. पावसाळ्यात पाण्याने तुडूंब भरून वाहणारे नाले सध्या हिरव्या पाण्याने आणि जलपर्णी यांनी भरलेले आहेत. नेरळ ग्रामपंचायतीकडून नालेसफाई झाली नसल्याने नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासन करते तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य लोक उपस्थित करू लागले आहेत.
नेरळ गाव हे मुंबईपासून दीड ते दोन तासाच्या अंतरावर असल्याने उपनगरीय लोकल सेवेमुळे नागरीकरण झपाट्याने झालेले उपनगर बनत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये नव्याने राहायला आलेले रहिवाशांसाठी उभा राहिलेल्या इमारती यातून बाहेर पडणारे सांडपाणी हे आता नेरळ गावासाठी समस्या बनत चालली आहे. माथेरान डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नेरळ गावातून दोन मोठे नाले पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असतात. पावसाळ्यात वाहणारे नाले जे पावसाळा संपल्यावर कोरडे पडतात तर काही नाल्यातून सांडपाणी वाहत उल्हास नदीपर्यंत जात असते. या उल्हास नदीमध्ये होणारे प्रदूषण लक्षात घेऊन नेरळ गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करावी अशी चर्चा सातत्याने होत असते. मात्र, ते नाले नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाकडून पावसाळा सुरू होण्याआधी स्वच्छ देखील होत नसल्याने पावसाळ्यातील पाण्याबरोबर नाल्यातील घाण आणि कचरा उल्हास नदीत जाण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही शहरात नालेसफाई एप्रिल महिना सुरू झाल्यावर सुरू होते. नेरळ ग्रामपंचायतीकडे स्वच्छता आणि आरोग्य विभागात 50-60 कामगार आहेत. कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कामगारांकडून गावातील गटारांची स्वच्छता करण्याची कामे होतात.
मात्र, नेरळ गावातून वाहणारे दोन मोठे नाल्यांची सफाई कोण करणार? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. माथेरानचे डोंगरातून पावसाचे पाणी पाडा भागातील नाल्यातून पलीकडे मातोश्री नगर असे वाहत गंगानगर आणि पुढे एसटी स्टॅण्ड भागातून उमानगर असे जात असते. तर नेरळ गावातून वाहणारा दुसरा मोठा नाला हा आनंद वाडी जवळील कोमल वाडी येथून येतो. हा नाला मोहाची वाडी कोतवाल वाडी असा खांडा भागातून रेल्वे स्टेशन असा पुढे उल्हास नदीकडे जातो. तर तिसरा मोठा नाला हा माथेरान डोंगरातून पुढे टपाल वाडी असे होऊन पायरमाळ येथून गणेश घाट ब्रिटिश कालीन धरण येथून पोलीस ठाण्याच्या बाजूने पुढे रेल्वे स्टेशनकडे जातो. या नाल्यांची नालेसफाई दरवर्षी काही प्रमाणात केली जाते.
गोरख शेप
यावर्षी देखील अशीच थातूरमातूर पद्धतीने नाल्यांची सफाई केल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीने केल्याचे सांगितले जात असून, नालेसफाई केली आहे. तर नाले पुन्हा कचऱ्याने तसेच हिरव्या रंगाचे पाण्याने भरले आहेत.
स्थानिक जागरूक नागरिक
