नेरळ ग्रामपंचायतीने हटवला ‘समस्या’ बॅनर

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ या शहरीकरण झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दैनंदिन समस्यांना दररोज सामोरे जावे लागत आहे. त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नेरळमधील रहिवासी आणि एका पक्षाचे पदाधिकारी संदीप उतेकर यांनी एक बॅनर नेरळ बाजारपेठमधील चौकात लावला होता. दरम्यान, संबंधित बॅनर लावण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळे ग्रामपंचायतीकडून सदर बॅनर जप्त करण्यात आला आहे.

संदीप उतेकर यांनी आपल्या राजकीय पक्षाचे नाव न घेता एक रहिवासी म्हणून तो एक बॅनर नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दर्शनी भागात लावला होता. त्या बॅनरवर नेरळ ग्रामपंचायतीमधून रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही, ग्रामस्थांना गढूळ पाणी प्यावे लागते, तसेच गावातील सर्व रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद आहेत. तर, गावातील गटारे तुंबली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याविरुद्ध उतेकर यांनी नेरळ ग्रामपंचायतीला आवाहन केले होते आणि मार्ग काढण्याची मागणी केली होती. बॅनर बाजारपेठ भागात लागल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी न घेता बॅनर लावलेला आहे आणि त्यामुळे बॅनर जप्त करण्याची कारवाई सदर बॅनर उचलून नेऊन केली आहे. याबाबत संदीप उतेकर यांनी आक्रमक पवित्र घेतला असून, आता रस्त्यावर उतरून ग्रामपंचायतीच्या कारभाराविरुद्ध आवाज उठवू, असे आश्वासन नेरळमधील जनतेला दिले आहे.

Exit mobile version