| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीने नाल्यांची साफसफाई आणि मान्सुन पूर्व कामांना करताना सुरुवात केली आहे. नेरळ ग्रामपंचायतीकडून गावातील मोठ्या नाल्यांमधील कचरा काढण्यासाठी जेसीबी मशीनचे सहाय्य घेतले जात आहे.
नेरळ गावात माथेरान डोंगरातून वाहणारे पाणी हे तीन वेगवेगळ्या नाल्यांमधून नेरळ ग्रामपंचायत हद्दी मधून उल्हास नदीकडे जाते. या नाल्यांमधून सांडपाणी वाहून नेणारे पाणी वाहून जात असते. त्यामुळे नाल्यांमध्ये झाडे झुडपे यांची वाढ होते. त्याचवेळी पावसाळ्यात वाहून येणारे दगड तसेच गाळ यांच्यामुळे नाल्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाहीत. दरवर्षी नाल्यांची साफसफाई नेरळ ग्रामपंचायतीकडून केली जाते. नेरळ ग्रामपंचायतीकडे 40 स्वच्छता कर्मचारी असून त्यांच्याकडून दररोज बाजारपेठ भागातील गटारे स्वच्छ केली जातात. मात्र, नाल्यांची सफाई होत नाही, ती स्वच्छता मान्सून पूर्व काळातील कामे म्हणून नेरळ ग्रामपंचायत प्रशासन करीत असते.
27 मे पासून नेरळ ग्रामपंचायतीकडून मान्सून पूर्व कामांना सुरुवात झाली आहे. मातोश्रीनगर, निर्माण नगरी, बस स्थानक हा नाला पूर्व भागातील असून मोहाची वाडी आणि गणेश घाट येथून येणारे दोन्ही नाले खांडा पूल येथे एकत्र येतात. तेथून पुढे उल्हास नदी असा त्यांचा प्रवास असतो. मातोश्री नगर भागातील नाल्यांची सफाई ग्रामपंचायतीकडून जेसीबी मशीनच्या सहाय्याने कचरा गोळा करण्याचे काम सुरू आहे. ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून तीन दिवसापूर्वी नाल्यांची स्वच्छता सोमवारपासून हाती घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होतीत्यानुसार नाल्यांची सफाई सुरू झाली आहे.
अरुण कार्ले .. ग्रामविकास अधिकारी नाल्यांची वार्षिक सफाई करण्याचे काम करण्याबाबत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांना नाले सफाईबाबत कल्पना देण्यात आली आहे. त्या त्या प्रभागातील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून नालेसफाईची पाहणी देखील सुरू आहे.
दैनिक कृषिवलचे बातमीचा दणका.. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नालेसफाई नाही अशा आशयाची बातमी दैनिक कृषिवलमध्ये सोमवार 27 मे रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यांनतर नेरळ ग्रामपंचायतीकडून त्याच दिवशी नालेसफाई करण्यास सुरुवात झाली आहे.







