। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायतीमधील सर्व 15 सदस्यांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. राजीनामा नाट्य आणि नंतर ते मंजूर होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र आजही एकमेव लोकप्रतिनिधी असलेल्या सरपंच उषा पारधी या सरपंच पदावर कायम आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक कधी येणार असा प्रश्न नेरळकर उपस्थित करीत आहेत.
कर्जत पंचायत समितीने ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अहवाल रायगड जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्रशासक यांची नियुक्ती कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. नेरळ ग्रामपंचायत मधील 16 पैकी 15 सदस्यांनी 18 जुलै रोजी सरपंच उषा पारधी यांच्या कारभाराला कंटाळून राजीनामा दिला आहे.त्यानंतर 29 जुलै रोजी सर्व राजीनामा पत्रांची पडताळणी झाली आणि राजीनामे मंजूर झाले. मात्र त्यानंतर पुढील सात दिवसात राजीनामा देणारा सदस्य हरकत घेऊन न्यायालयात जाऊ शकतो आणि त्यासाठी मुदत असते. ही मुदत चार ऑगस्ट रोजी संपली असून सर्व अहवाल कर्जत पंचायत समितीला ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून सादर करण्यात आला आहे.
या अहवालावर आपले पत्र जोडून कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी अहवाल रायगड जिल्हा परिषदेकडे पाठवायचा असतो. गटविकास अधिकारी यांचा अहवाल 7 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा परिषदेकडे पोहचला आहे.त्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून होणार आहे.
राजीनामा देणारे सदस्य यांचा कालावधी साधारण 20 दिवसांचा झाला असून आजपर्यंत नेरळ ग्रामपंचायत बरखास्त होण्याचा आदेश जिल्हा परिषदेने पारित करण्याची गरज होती. मात्र आजतागायत जिल्हा परिषदेकडून असे आदेश पारित झाले नसून ज्या जिल्हा परिषदेने याच नेरळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर का कारवाई करू नये, यासाठी 9 जुलै रोजी पत्र पाठवली होती.
रायगड जिल्हा परिषद आता नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार एकमेव सदस्य असलेल्या सरपंच यांच्याकडून करून घेताना दिसत आहे. रायगड जिल्हा परिषदेचे आशीर्वाद नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी यांना आहेत काय? असा सवाल नेरळ ग्रामस्थ विचारत आहेत. आपले सर्व सदस्यांचे राजीनामे मंजूर झालेले असताना एकमेव सरपंच उषा पारधी कारभार हाकत असून त्यांना जिल्हा परिषद पाठिंबा देत आहे काय? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. मात्र सदस्यांचे राजीनामे दिल्यानंतर मनमानीचे आरोप झाल्यावर नैतिक जबाबदारी म्हणून सरपंच उषा पारधी या राजीनामे देऊन मोकळ्या होतील असे वाटले होत. मात्र त्यांचे पद रिक्त होईपर्यंत त्या पदावर चिकटून बसल्या आहेत याचे आश्चर्य नेरळकरांना आहे.