योजनेचे पाईप जळून खाक; आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचे काम अनेक वर्षे सुरू आहे. अनेक वर्ष रखडलेल्या या नळपाणी योजनेचे मोहाची वाडी येथे पडून राहिलेले पाईप तेथे लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. त्यामुळे आता नेरळ ग्रामपंचायतीची नळपाणी योजना संकटात आली असून, या आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट निर्माण झाले होते.
नेरळ ग्रामपंचायतचे 40 कोटींच्या जलजीवन मिशन मधील प्रादेशिक नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम अनेक वर्षे रखडले असून, योजनेच्या कामासाठी आणलेले काळ्या रंगाचे पाईप मोहाची वाडी येथे आणून टाकण्यात आले होते. नेरळ जवळील मोहाची वाडी परिसरात जलजीवन मिशनच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाईपचा साठा करून ठेवण्यात आला होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे परिसरातील गवताने अचानक पेट घेतला.
मोहाची वाडी येथील मोकळ्या जागेत साठवून ठेवण्यात आलेल्या ते पाईप सुक्या गवताला लागलेल्या आगीमुळे जळून खाक झाले आहेत. ही आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली आणि थेट पाईपच्या साठ्यापर्यंत पोहोचली. पाईप प्लॅस्टिकचे असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आणि काही वेळातच मोठ्या प्रमाणात साठा जळून खाक झाला. आगीची माहिती मिळताच नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कर्मचाऱ्यांनी तात्काळ पाण्याचे टँकर मागवले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आगीचा प्रसार अधिक होण्यापासून रोखला गेला आणि मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, घटनास्थळावरील दृश्य पाहता मोठ्या संख्येने पाईप निकामी झाले असून योजनेच्या कामाला यामुळे खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
