सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गावाच्या हद्दीत असलेल्या खांडा येथील लहान पूल 29 जूनपासून वाहतुकीस बंद केला आहे. हा पूल बंद झाल्यानंतर बाजूच्या पुलावरून वाहतूक सुरु आहे. मात्र, मोठी वाहने आल्यावर वाहनांची कोंडी होत असते. मात्र, मागील 15 दिवसांत त्या पुलाच्या दुरुस्तीबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नसल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. दरम्यान, बांधकाम विभागाने त्या पुलाच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या कामाला सुरुवात केलेली नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या कायमची राहणार आहे.
खांडा येथे लहान उंचीचा पूल असून, माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी कोतवाल वाडी भागातून या ठिकाणी येते आणि वाहत जाते. रस्ता खचला असल्याची माहिती मिळाल्यानंतर 29 जूनपासून हा रस्ता वाहतुकीस बंद आहे. तेव्हापासून बाजूच्या पुलावरून वाहतूक केली जात असून, तो पूल अरुंद असल्याने मोठे वाहन आल्यावर एकाच वाहन तेथून जाते. त्या ठिकाणी लहान पुलाच्या बाजूला एमएमआरडीएने नवीन पूल बांधला होता. तेथून जाणारा दुहेरी रस्ता पूर्ण झाला नसल्याने नवीन पूल वाहतुकीस वापरला जात नव्हता. आता या पुलावरूनच वाहतूक सुरु आहे. मात्र, तो पूल दोन वाहनांसाठी योग्य नसल्याने वाहतूक कोंडी ही मोठी संशय बनली आहे.
त्यामुळे नादुरुस्त झालेल्या पुलाची डागडुगी तसेच नवीन पुलाचे बांधकाम याबद्दल कोणत्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही. 29 जून रोजी पूल वाहतूक बंद आहे, याचे बॅरेकेट्स वगळता अन्य कोणतीही नवीन कामे त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून झालेली नाहीत. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी असून, तेथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत. वाहनांची गर्दी आणि कर्कश हॉर्न यामुळे परिसर त्रासला आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे उरण या ठिकाणी बसणारे अधिकारी या रस्त्याचे काम पाहण्यासाठी यायला तयार नाहीत. त्यामुळे हा पूल अनेक महिने अशाच अवस्थेत राहण्याची शक्यता आहे.