मिनी ट्रेन सेवा 20 ऑक्टोबरपासून सुरू
| माथेरान | प्रतिनिधी |
पावसाळ्यामुळे बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन दसऱ्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. मंगळवारी (दि.20) ही सेवा पूर्ववत होईल. त्यामुळे पर्यटकांना नेरळपासूनच माथेरानपर्यंत मिनी ट्रेनने प्रवास करता येईल. दसऱ्याच्या मुहूर्तावर मिनी ट्रेन सुरू होत असल्याने माथेरानमधील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 15 जूनपासून नेरळ-अमन लॉजदरम्यानची नियमित सेवा बंद केली होती; मात्र अमन लॉज माथेरानदरम्यान शटल सेवा सुरू होती. त्यामुळे पर्यटकांना अमन लॉजपासून पुढे मिनी ट्रेनने प्रवास करता येत होता. आता मंगळवारी (दि.20) नेरळ-अमन लॉजदरम्यानची सेवाही सुरू होणार आहे.
माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. वळणावळणाच्या रेल्वे मार्गावरून धावताना हिरव्यागार डोंगरांचे आणि निसर्गरम्य परिसराचे दर्शन घडते. पावसाळ्यानंतरचा निसर्ग पाहण्यासाठी माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना या प्रवासाची विशेष उत्सुकता असते. पर्यटकांना निसर्गसफरीचा आनंद घेण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. याचा फायदा स्थानिक पर्यटन व्यवसायालाही होण्याची शक्यता आहे.
