नेरळ-माथेरान मार्ग ठप्प; कारण काय?

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्या पक्क्या रस्त्यापासून वंचित आहेत. या आदिवासी वाड्यांच्या रस्त्याचे भुमीपूजन होऊन दोन महिने लोटले असून कोणतेही काम सुरू झाले नाही. अखेर 12 आदिवासी वाड्यांमधील आदिवासी लोकांनी शनिवारी (दि.9) नेरळ माथेरान घाट रस्ता रोखून धरला. तब्बल दीड तास माथेरान घाट रोखून धरल्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम मंजूर झाले असल्याचे पत्र प्राप्त झाल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, माथेरानकडे जाणार्‍या वाहनांचा खोळंबा झाला आणि जुम्मापट्टीपासून दोन्ही बाजूंनी किमान दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागून राहिलेल्या होत्या.


माथेरान डोंगरातील नेरळ-माथेरान घाट रस्ता येथून जुम्मापट्टी धनगर वाडा ते किरवली ठाकूर वाडी या माथेरानच्या डोंगरातील 12 आदिवासी यांना जोडणारा रस्ता आजही नाही. त्यामुळे या भागातील आदिवासी लोकांनी आज तिसर्‍यांदा रस्ता रोको आंदोलन केले. यापूर्वी प्रत्येक वेळी शासनाकडून लेखी आश्‍वासन देण्यात आले असले तरी ते आश्‍वासने शासनाने पूर्ण केले नाही.त्याचवेळी रस्त्याचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईनद्वारे केले. ते भूमिपूजन होऊन दोन महिने उलटले तरी रस्त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. मागील दोन महिन्यात माथेरान डोंगरातील 12 आदिवासी वाड्यांच्या रस्त्याच्या कामाला तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे आपली फसवणूक केली अशी भावना या भागातील आदिवासी लोकांची झाली आहे.

आदिवासी समाजाचे कार्यकर्ते 12 आदिवासी वाड्यांमधील कार्यकर्ते आणि शेकडो ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरले. सकाळी साडेदहा वाजता जैतू पारधी आणि गणेश पारधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले. त्यानंतर कर्जत तालुका आदिवासी संघटना देखील आंदोलनाला पठण देण्यास आली. धनगर वाडा, जुम्मापट्टी, आसंलवाडी, बेकरे वाडी, मणा धनगर वाडा, नाण्याचा माळ, सागाची वाडी, चिंचवाडीमधील ग्रामस्थ हे आंदोलनात सहभागी झाले होते. आदिवासी कार्यकर्त्यांनी रस्ता रोको सुरू केल्यानंतर दुपारी पावणे बारा वाजता पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थगित करण्यात आले. स्थानिक कार्यकर्ते सुनील पारधी, माजी नगरसेविका सुनिता आखाडे, नितीन पारधी, जोमा निरगुडे, लक्ष्मण आखाडे यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडल्याने वाहतुकीचा खोळंबा झालेले पर्यटकदेखील आंदोलनस्थळी शांतपणे उपस्थित होते.

आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा तसेच, दत्ता निरगुडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंगाडे, जयेंद्र कराळे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. नेरळ बाजूकडे नांगर खिंडपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

कार्यकर्ते आपला रस्ता बनणार याचे लेखी पत्र मिळेपर्यंत रस्ता रोको कायम ठेवणार या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे तपासासाठी बाहेर असलेले प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे तेथे पोहचले. त्यांनी माथेरान डोंगरातील 12 आदिवासी वाड्या यांच्याकडे जाणारा 13 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करणार्‍या महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा यांचे पत्र आंदोलनकर्त्यांना दिले. त्या पत्रानुसार रस्त्याचे काम मंजूर झाले असून संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना सोमवारी नेरळ येथे बोलावून घेऊ आणि रस्ता लवकर कसा पूर्ण होईल याची कार्यवाही करू असे आवाहन केले. शेवटी मुख्य आंदोलनकर्ते जैत पारधी आणि गणेश पारधी यांनी सोमवारी योग्य निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन करू, मात्र आजचे आंदोलन स्थगित करीत असल्याचे जाहीर केले.

Exit mobile version