नेरळ पोलीस ठाणे इमारतीची आयएसओ मानांकनाकडे वाटचाल

| नेरळ | वार्ताहर

रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या इमारती आकर्षक करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. त्यात काही ठराविक बाबींवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात एकसंगती ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या होता. त्यातून नेरळ पोलीस ठाणे यांनी सर्व बाबींमध्ये भारीभव कामगिरी करीत आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी आपली वाटचाल सुरु केली आहे.

जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले नेरळ पोलीस ठाणे हे उपनगरीय लोकलने जोडले असल्याने महत्वाचे पोलीस ठाणे आहे. त्यात नेरळ पोलीस ठाणे हद्दीच्या बाजूला ठाणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचा परिसर असल्याने मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्या परिसरात राहतात आणि गुन्हे करून कर्जत तालुका हद्दीत लपून राहतात. कधी कधी ठाणे जिल्ह्यातील सराईत गुंड हे कर्जत तालुका हद्दीत गुन्हे करून ठाणे जिल्ह्यात पसार होत असतात. त्यामुळे सर्व दृष्टीने महत्वाचे असलेले नेरळ पोलीस ठाण्याची सध्याची वास्तू हि तिसरी ठिकाणी स्थलांतरित केलेली वास्तू आहे.

पोलीस अधीक्षक घार्गे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी हायटेक करण्याची सूचना केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व 27 पोलीस ठाणी कामाला लागली होती. नेरळ पोलीस ठाणे यांच्या प्रभारी अधिकारी यांच्याकडून आपल्याला मिळालेल्या मोठ्या जागेचा फायदा घेण्यासाठी सर्व काही सुटसुटीत व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याच्या दुमजली इमारतीत आणखी नवीन बांधकामे वेळेत पूर्ण करून त्या ठिकाणी जुन्या कागदपत्रांच्या सुरक्षेसाठी पुणे येथून नवीन कपाटे आणण्यात आली. पोलीस ठाण्याची हद्द ज्या ठिकाणी संपते त्या नेरळ पोलीस ठाणे हद्दीची माहिती देणारे फलक उभे राहिले आहेत. ते फलक नेरळ कशेळे, नेरळ कर्जत, नेरळ कल्याण आणि नेरळ कळंब मुरबाड या रस्त्यावर लावले गेले आहेत. तर मुख्य इमारतीच्या बाहेर तारांकित हॉटेल यांना लाजवेल अशी गेट आणि बाहेरच्या बाजूला दगडी कुंपणाला लागून झाडे लक्ष वेधून घेतात. तर इमारतीमधील सर्व खोल्यांमधील फलक हे दोन विशेष रंगांनी बनवले गेले असल्याने त्याची देखील रंगसंगती दिसून येते. तर पोलीस ठाण्याच्या मुख्य इमारतीच्या मागे असलेली कर्मचारी निवासस्थान येथे देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नेरळ पोलीस ठाणे यांच्याकडून आता आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. असे मानांकन मिळविणारे नेरळ पोलीस ठाणे 2024 मध्ये आयएसओ मानांकन मिळविणारे पोलीस ठाणे ठरू शकते.

Exit mobile version