गावठी दारूचा ट्रक पकडला
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्हा पोलीस दलाकडून अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेंतर्गत नेरळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कल्याण राज्यमार्ग रस्त्याने वांगणी येथून नेरळच्या दिशेने येणाऱ्या एका पिकअप टेम्पोचा थरारक पाठलाग करून पोलिसांनी तब्बल 315 लीटर अवैध गावठी दारूसह 3 लाख 58 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रायगड पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यात रात्रगस्त आणि नाकाबंदी अधिक प्रभावी करण्यात आली आहे. याच मोहिमेंतर्गत रविवारी (दि.12) पहाटेच्या सुमारास रायगड-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील शेलू चेकपोस्टवर नाकाबंदी लावण्यात आली होती. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास वांगणीकडून नेरळच्या दिशेने येणारा पिकअप टेम्पो चेकपोस्टवरून जात असताना पोलीस उपनिरीक्षक शेंबडे यांनी वाहन थांबवून चौकशी केली. मात्र, चालकाने टेम्पो रिकामा असल्याचे सांगितले आणि पोलिसांना गुंगारा देऊन टेम्पो नेरळच्या दिशेने वेगाने पळवला. दरम्यान, चालक पळून जात असल्याचे लक्षात येताच पीएसआय शेंबडे यांनी तातडीने नेरळचे अंमलदार दत्ता किसवे यांना यबाबत माहिती दिली आणि त्या टेम्पोचा पाठलाग सुरू केला. नेरळ पोलीस ठाण्यासमोर पोलिसांनी सापळा रचून हा टेम्पो अडवला. या टेम्पोची झडती घेतली असता, त्यात गावठी दारूने भरलेल्या एकूण 9 रबरी ट्यूब आढळून आल्या. त्यामध्ये सुमारे 315 लीटर दारू होती. पोलिसांनी दारू आणि टेम्पोसह एकूण 3 लाख 58 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी अंबरनाथ येथील रहिवाशी शकील खलील शेख (21) आणि योगेश गदलू वायले (34) या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







