। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वे वरील मुंबई- पुणे मार्गावरील नेरळ स्थानकाच्या पुढे असलेल्या रेल्वे गेट दुरुस्तीच्या कामासाठी चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. फाटक बंद राहणार असल्याने वाहन चालक यांना पर्यायी रस्त्यांचा अवलंब करावा लागणार आहे. 6 जानेवारीच्या रात्रीपासून 9 जानेवारी पर्यंत नेरळ रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवले जाणार आहे.
नेरळ- कर्जत मार्गावरील नेरळ गावात असलेले गेट हे दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवले जाणार आहे. नेरळ फाटक येथे असलेल्या रेल्वे मार्गिका यातील खडी खचल्याने तेथे रस्ता ओलांडत असलेल्या ठिकाणी वाहने अडकून पडत आहेत. त्याचवेळी वाहनाची होणारी कोंडी ही प्रामुख्यानं त्या भागातील रस्त्याची दुरवस्था ही देखील कारणीभूत आहे. त्यामुळे नेरळ रेल्वे गेट क्रमांक 21 तांत्रिक कामासाठी सलग चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान वाहतुकीचा खोळंबा आणि पर्यायी रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. वाहनचालकांना आता दामत रेल्वे गेट ते आंबिवली रेल्वे गेट असा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, या पर्यायी मार्गांवर सध्या रस्त्यांची कामे सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नेरळ येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. वारंवार रेल्वे गेट मध्ये होणारे तांत्रिक बिघाड आणि आता थेट चार दिवस बंद असल्यामुळे नेरळकरांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. रेल्वे प्रशासनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि रखडलेल्या उड्डाणपुलाबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्थानिकांना नाहक त्रास
नेहमीच तांत्रिक कामाचे कारण सांगून फाटक बंद केले जाते. आता तर सलग चार दिवस फाटक बंद राहणार असल्याने आमचे दैनंदिन नियोजन कोलमडणार आहे. पर्यायी रस्त्यांची अवस्था पाहता प्रशासनाने आधी त्यांचे नियोजन करायला हवे होते.







