नेरळ स्थानकाचे फाटक पाच दिवस बंद; वाहनचालकांची गैरसोय

| नेरळ । वार्ताहर ।

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ रेल्वे स्थानकाच्या पुढे असलेले फाटक हे दुरुस्तीच्या कामासाठी पाच दिवस बंद राहणार आहे. या फाटकावरील रुळाखाली असलेला पृष्ठपाठ सुरळीत करण्यासाठी फाटक बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, हे फाटक बंद राहणार असल्याने नेरळ पूर्व भागातील 100 हुन अधिक गावातील रहिवाशी यांना नेरळ गावात येण्यासाठी काही किलोमीटर अंतराचा फेरा घेऊन येता-जाता येणार असल्याने मोठी कसरत करावी लागणार आहे. बुधवार (5) पासून 12 ऑक्टोबरपर्यंत नेरळ फाटक वाहनासाठी वाहतूक करण्यास बंद असणार आहे.

मध्य रेल्वे वरील मुंबई- पुणे मार्गावर कर्जत एंडकडील नेरळ या जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पुढे मध्य रेल्वेचे फाटक आहे. 87 किलोमीटरवर गेट नंबर 21 येथे असलेल्या फाटकाच्या वापर नेरळ गाव जोडण्यासाठी होत असून नेरळ पूर्व भागातील असंख्य गावातील रहिवाशी यांच्याकडून त्या फाटकाच्या वापर नेरळच्या मुख्य बाजारपेठ भागात येण्यासाठी होत असतो. त्यामुळे या फाटकातून होणारी वाहनांची वाहतूक मोठी आहे. त्यामुळे सातत्याने त्या भागातील रेल्वे मार्गिकेखाली असलेल्या पृष्ठापाठाचे नुकसान होत असते आणि त्यामुळे त्याची दुरुस्ती सातत्याने करावी लागते. त्या पृष्ठभागाच्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पीडब्लूआय विभागाने घेतला आहे. त्यानुसार या फाटकाच्या वापर करणारे वाहनचालक यांना माहिती व्हावी यासाठी नोटीस जरी केली आहे.

काय होणार परिणाम
मध्य रेल्वे वरील हे फाटक बंद केले जाणार असल्याने नेरळ पूर्व भागातील कोल्हारे, दहिवली तर्फे वरेडी, मानिवली, पोशीर, कळंब, वारे, ओलमन, वाकस, पिंपळोली, बोरिवली या ग्रामपंचायतमधील रहिवाशांना आपली वाहने घेऊन नेरळ बाजारपेठमध्ये येता येणार नाही. तर नेरळ मुख्य गावातील रहिवाशी यांना देखील आपली वाहने घेऊन पलीकडे पूर्व भागात वाहने घेऊन त्या फाटकातून जाता येणार नाही.

वाहतुकीचे पर्याय…
नेरळ पाडा हे फाटक बंद केले जाणार असल्याने नेरळ पूर्व भागातील रहिवाशी यांना नेरळ मुख्य गावात येण्यासाठी दामत फाटक येथून म्हणजे तब्बल चार किलोमीट अंतर पार करून जावे लागणार आहे. तर दुसरा पर्याय हे आंबिवली येथील फाटक असून ते फाटक नेरळ पाडा गेट पासून पाच किलोमीटर अंतरावर असून तेथे जाणे आणि पुन्हा नेरळ गावात पोहचणे यासाठी आठ ते नऊ किलोमीटर अंतर पार करून म्हणजे अनेक किलोमीटरचा फटका वाहनचालक यांना बसणार आहे.

Exit mobile version