पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा आर्त टाहो; रस्त्याच्या कामात जलवाहिनी तोडली
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ- कळंब रस्त्यालगत धामोते भागात नारायण फेणाणी प्रलंबित वेल्फेअर ट्रस्ट संचालित नेरळ विद्या भवन ही शाळा आहे. या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेचे पंचक्रोशीत नाव आहे. या शाळेत जाणारी नळपाणी वाहिनी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून दि.3 फेब्रुवारी रोजी तोडण्यात आली आहे. सध्या येथील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ सुरु आहे. असे असताना या शाळेच्या विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उभे राहून ‘पाणी पाहिजे’, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या बाजूला नेरळ विद्या भवन शाळा असून त्या शाळेची जलवाहिनी या रस्त्याच्या कडेने पुढे जाते. दि.3 फेब्रुवारी रोजी जेसीबी मशीनने या डांबरी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यात विद्या भवन शाळेत जाणारी जलवाहिनी देखील तोडली गेली. तसेच, शाळेच्या मागच्या बाजूला या जेसीबी व पोकलन मशीन उभ्या केल्या जातात. त्यामुळे शाळेच्या आवारातूनच अवजड मशीनची ये-जा होत असल्याने पाईपलाईन अनेक ठिकाणी दबली गेली असल्याचे बोलले जात आहे. ही जलवाहिनी तुटून तब्बल 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटले तरी तिची दुरूस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. परिणामी या शाळेतील सुमारे 200 विद्यार्थ्यांना घरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. तसेच, बाथरूममध्ये पाण्याचा थेंब नसल्याने विद्यार्थ्यांना खास करून विद्यार्थीनींची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे.
याबाबत नेरळ विद्या भवन शाळेच्या शिक्षकांनी कोल्हारे ग्रामपंचायत, कर्जत तहसीलदार आणि कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे. तरीदेखील संबंतिधत ठेकेदाराने जलवाहिनी दुरुस्तीचे काम केलेले नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनासह विद्यार्थी आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरून पाण्यासाठी आर्त टाहो फोडत आहेत. आमच्या पाण्याची लाईन ही ठेकेदाराने पूर्ववत करून द्यावी, अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. दरम्यान, परीक्षा काळात पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली असल्याने प्रशासन बघ्याची भूमिका घेणार की ठेकेदार कारवाईचा बडगा उगारत शाळेला न्याय मिळवून देणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
आंदोलनाचा इशारा
शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या समोरून जाणारा ट्रक अडवून ठेवला व त्यानंतर रस्त्याचे काम देखील अडविण्याचा इशारा दिला. यावेळी शाळेचे शिक्षक सचिन अभंगे आणि संतोष कांबरी यांनी शाळेच्यावतीने पुढील 2 दिवसांत जलवाहिनी नवीन टाकण्याचे आवाहन केले आहे. जर 2 दिवसांत शाळेची जलवाहिनी नव्याने टाकण्यात आली नाही, तर शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग नेरळ-कळंब रस्त्यावर बसून आंदोलन करतील, असे शिक्षकांनी जाहीर केले.
