18,000 फुटांवर लोकनेते दिबांचा जयजयकार

लडाखच्या खरडुंगला पासवर मागणीचे फलक
विमानतळाला नाव देण्याची नेरळच्या तरुणांची मागणी
नेरळ | वार्ताहर |
नेरळ परिसरात राहणारे आणि व्यवसायाने अभियंते असलेल्या तरुणांनी लेह लडाख येथे जाऊन समुद्र सपाटीपासून 18,000 फुटांवर असलेल्या खरडुंगला पास येथे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा जयजयकार केला. तेथे या तरुणांनी तिरंगा झेंडा फडकवत दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, या मागणीसाठी फलक लावला.
नेरळ येथील व्यवसायाने अभियंते असलेले तरुण रोहित चंचे, जयेश कालेकर, हर्षल घोरपडे, निखिल घोरपडे, कांतीलाल चौधरी आणि मुरलीधर सूर्यराव हे तरुण पर्यटनासाठी लेह आणि लडाख राज्यात गेले होते. तेथील खारडुंगला पास येथे पोहचवून साधारण 17982 फुटांवरील त्या पासजवळ जात भारताचा तिरंगा फडकवत जल्लोष केला.

मात्र, नेरळ आणि बदलापूर येथील या तरुणांनी त्या खारडुंगला पास येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रश्‍नावर भाष्य केले. या विमानतळाला स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी जाहीरपणे भाषण देत केली. तेथे जमलेल्या असंख्य पर्यटकांसमोर या तरुणांनी दि.बा. पाटील यांच्या कार्याची महती सांगून त्यांचे नाव विमानतळाला देणे कसे योग्य आहे, हे सांगितले.
नेरळ आणि बदलापूर येथील या पाच तरुणांच्या लेह लडाखमध्ये जाऊन तिरंगा फडकवण्याच्या कृतीचे कौतुक कर्जत तालुक्यात केले जात आहे. त्याबाबत नेरळ भडवळ गावातील सिव्हिल इंजिनिअर जयेश कालेकर यांनी संधी मिळेल तेथे आम्ही लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मागणी केली जाईल, असे स्पष्ट केले.

Exit mobile version