नेदरलँड्स, ऑस्ट्रिया बाद फेरीत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नेदरलँड्स आणि ऑस्ट्रिया यांनी साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत थाटात प्रवेश केला. जॉर्जिनियो विजनाल्डम याने साकारलेल्या दोन गोलमुळे नेदरलँड्सने उत्तर मॅसेडोनियाचा 3-0 असा पराभव करत क गटात अग्रस्थान पटकावले. ऑस्ट्रियाने बलाढ्य युक्रेनचे आव्हान 1-0 असे परतवून लावले.

उत्तर मॅसेडोनियाने सुरुवातीला प्रतिकार केल्यानंतर नेदरलँड्सचे सामन्यावर वर्चस्व पाहायला मिळाले. 24व्या मिनिटाला मेम्फिस डिपे याने नेदरलँड्सचे खाते खोलल्यानंतर कर्णधार विजनाल्डम याने दुसर्‍या सत्रात दोन गोल करत उत्तर मॅसेडोनियाला संकटात आणले.

विजनाल्डमने 51व्या मिनिटाला दुसर्‍या गोलची भर घातल्यानंतर सात मिनिटांनी आणखी एक गोल करत नेदरलँड्सला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. या तीन धक्क्यांतून उत्तर मॅसेडोनियाचा संघ सावरू शकला नाही. सलग तिसर्‍या विजयासह नेदरलँड्सने क गटात नऊ गुणांसह अग्रस्थान पटकावत दिमाखात बाद फेरी गाठली.

ऑस्ट्रियाने युक्रेनला 1-0 असा पराभवाचा धक्का देत बाद फेरी गाठली. ख्रिस्तोफ बॉमगार्टनर याने 21व्या मिनिटाला केलेला गोल ऑस्ट्रियाच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. युक्रेनने गोल करण्यासाठी आपल्या सर्व आघाडीवीरांना संधी दिली, पण ऑस्ट्रियाच्या भक्कम बचावासमोर त्यांना गोल करता आला नाही.या विजयासह ऑस्ट्रियाने क गटात सहा गुणांसह दुसरे स्थान प्राप्त करत आगेकूच केली.

Exit mobile version