श्रीलंकेकडून नेदरलँड्सचा पराभव

| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |

टी-20 विश्वचषकाच्या 38 व्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा 83 धावांनी पराभव केला. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी क्रिकेट मैदानावर नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 6 गडी गमावून 201 धावा केल्या आणि नेदरलँडला 202 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ 16.4 षटकांत सर्वबाद 118 धावांवर आटोपला.

या विश्वचषकात 200 धावा करणारा श्रीलंका हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी 17व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 201 धावा केल्या होत्या. या दोन संघांशिवाय या विश्वचषकात अन्य कोणत्याही संघाला 200 धावांचा टप्पा गाठता आला नाही.

श्रीलंकेसाठी कुसल मेंडिस आणि चारिथ असलंका यांनी 46-46 धावांची खेळी खेळली. धनंजय डी सिल्वाने 34 आणि अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 30 धावा केल्या. कर्णधार वानिंदू हसरंगाने अखेरच्या डावात 6 चेंडूत 20 धावांची नाबाद खेळी केली. नेदरलँडकडून लोगान व्हॅन बीकने दोन बळी घेतले. टीम प्रिंगल, व्हिव्हियन किंगमा, पॉल व्हॅन मीकरेन आणि आर्यन दत्त यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड संघाच्या फलंदाजांवर मोठी धावसंख्या उभारण्याचे दडपण होते. मायकेल लेविट आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्स यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. या दोन्ही फलंदाजांनी 31-31 धावा केल्या. सायब्रँड एंजेलब्रेक्ट (11), मॅक्स ओफडॉडने 11 आणि आर्यन दत्तने 10 धावा केल्या.

या विजयासह श्रीलंका ड गटात 1 विजयानंतर 3 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नेदरलँडचा संघ 4 सामन्यांत 2 गुणांसह चौथ्या स्थानावर असून नेपाळ संघ 4 सामन्यांत 1 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका 4 सामन्यात 4 विजय मिळवून 8 गुणांसह पहिल्या स्थानावर असून बांगलादेश संघ 4 सामन्यात 3 विजय आणि 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

Exit mobile version