पुढील 24 तास धोक्याचे; हवामान विभागाकडून “रेड अलर्ट”

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोकणात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील अनेक भागात गेल्या 48 तासांपासून मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भाकडे पाठ फिरवलेला मोसमी पाऊस पुन्हा एकदा विदर्भात दाखल झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने येत्या 24 तासांत विदर्भासह कोकण, पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात पावसाचा “रेड अलर्ट” दिला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर ते अगदी कोकण पट्ट्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची प्रणाली असून, ही प्रणाली अंतर्गत भागांच्या दिशेने सरकताना दिसणार आहे. त्यामुळे 19 ते 21 जुलै दरम्यानच्या काळात कोकण, पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपरनगरांसह राज्याच्या घाटमाथ्यावरील परिसरामध्ये भर दिवसा काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळणार आहे. सातारा, कोल्हापूरासह कोकण आणि पुण्यातील घाटमाथ्यावर दृश्यमानतेवर याचे परिणाम होताना दिसून येतील. दरम्यान, या घाट क्षेत्रामध्ये मध्यम ते मुसळधार आणि काही ठिकाणांवर अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Exit mobile version