सुचना! पुढील 4 तास धोक्याचे; घराबाहेर पडणं टाळा

। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड, मुंबई, ठाणे, पालघरसह सातारा आणि कोल्हापूर अशा बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. मागील काही तासांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर यासह कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरु आहे. याशिवाय पुढील काही तासांत हा पाऊस आणखी वाढू शकतो. त्यामुळे गरज नसल्यास पुढील काही तास घराबाहेर न पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

दुपारपासून कोकण किनारपट्टी भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सध्या मुंबईतील दादर, सायन, वरळी या शिवाय उपनगरीय भागात धो-धो पाऊस पडत आहे. ठाण्यापासून पुढे कल्याण तसेच अंबरनाथपर्यंत धुवांधार पाऊस सुरु आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरु असून लोकल जवळपास 20 ते 30 मिनिटं उशीराने सुरु आहेत.

वाशी, बेलापूर, खारघर, पनवेल परिसरात धुवांधार पाऊस कोसळत आहे. या सर्वामुळे शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली जाऊ लागले आहेत. वाढत्या पावसामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांना काळजी घेणे अनिवार्य झाले आहे. कोकणातही जोरदार पाऊस सुरु असून समोर आलेल्या माहितीनुसार चिपळूणमध्ये पावसाची जबरदस्त बॅटींग सुरु आहे. याच पावसामुळे चिपळूणच्या सखल भागात पाणीच पाणी साठले आहे.

Exit mobile version