। उरण । वार्ताहर ।
दररोज पाच तास पाणी पुरवठा करण्याचे सिडकोने दिलेले आश्वासन फोल ठरल्याने आणि 15 दिवसात फक्त अर्धा तासच पाणी मिळत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय सुमारे 250 न्हावा ग्रामस्थांनी सिडकोच्या कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून अधिकार्यांना घेराव घातला.
न्हावा ग्रामपंचायतींची न्हावा-खाडी आणि तीन पाडे मिळून जवळपास साडेचार हजार लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या मानाने दररोज नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीची दररोज दिड लाख लिटर पाण्याची मागणी आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून मागणीच्या निम्म्याहूनही कमी पाणी पुरवठा होत आहे. अपुर्या पाणीपुरवठ्यामुळे मात्र नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर येऊन ठेपली आहे. पाणी टंचाईमुळे नागरिकांवर तलाव, विहीर आणि उपलब्ध होणार्या इतर स्त्रोतचा आधार घ्यावा लागत आहे. त्यानंतरही पुरेश्या प्रमाणात नागरिकांना पाणी मिळत नाही.
पाणी टंचाईचे संकट दूर करण्याच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या न्हावा ग्रामस्थांनी सोमवारी (दि.21) सिडको भवनावरच धडक दिली. इतक्यावरच न थांबता महिलांसह संबंधित विभागाच्या अधिकार्यांना घेराव घालून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळीही अधिकार्यांनी पुन्हा एकदा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. या सर्व पक्षीय आंदोलनप्रसंगी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच मंजुषा ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, माजी सरपंच जागृती ठाकूर ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष शैलेश पाटील, माजी उपसरपंच किसन पाटील, ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत भोईर, महिला मंडळ अध्यक्षा मिनाक्षी पाटील, शांता म्हात्रे आणि सुमारे 250 ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या मोठी होती.