| नवी दिल्ल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी (दि. 11) दिल्ली कार स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला. सोमवारी संध्याकाळी मध्य दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ हुंडई आय20 कारमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटातील मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. वीस जखमींवर उपचार सुरू आहेत. दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. उर्वरितांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवली जाईल.
सोमवारी संध्याकाळी 6.52 वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ चालत्या कारमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला होता. या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे हे शोधून काढणार आणि त्यांना धडा शिकवणार, असं पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. आता मराठी अधिकारी अर्थात एनआयएचे प्रमुख सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली या स्फोटाचा तपास होणार आहे. दरम्यान, स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी गृहमंत्र्यांनी सांगितले होते की, सर्व शक्यतांचा शोध घेतला जात आहे आणि सर्व पर्याय विचारात घेऊन सखोल चौकशी केली जाईल.







