चित्रलेखा पाटील यांचे विशेष सहकार्य; निनाद स्पोर्ट्स संघाची दुसऱ्यांदा बाजी
| अलिबाग | संतोष राऊळ |
चौल बॉक्स क्रिकेट असो.च्या मान्यतेने, शेतकारी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्याने व जान्हवी तळे क्रीडा मंडळ चौल तर्फे नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा शनिवारी (दि.28) चौल येथील जान्हवी तळे पटांगणावर यशस्वी रित्या पार पडल्या. या मर्यादित 3 षटाकांच्या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. तर, चुरशीच्या अंतिम सामन्यात निनाद स्पोर्ट्स आग्राव संघाने एकविरा भगवती संघाला नमवत दुसऱ्यांदा बाजी मारली आहे.

अलिबाग तालुक्यातील चौल येथील जान्हवीचे तळे या ठिकाणी नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेसाठी शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, निलेश खोत, शरयु अधिकारी, अनुजा मोरे, अभिजीत वाळंज आदींसह शेकाप कार्यकर्ते, ग्रामस्थ व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येन उपस्थित होते. तसेच, या स्पर्धेदरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे, शेकाप कार्यकर्ते नितिन सारंग, मनिष कवळे, संतोष राऊळ आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी आणि मान्यवरांनी भेट दिली.

या स्पर्धेतील अंतिम सामना निनाद स्पोर्ट्स आग्राव व एकविरा भगवती यांच्यात रंगला. यावेळी प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या एकविरा भगवती संघाने 3 षटकांत 21 धावा ठोकल्या. त्यांनतर लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या निनाद स्पोर्ट्स संघाने 22 धावांचे लक्ष 2.2 षटकांत सहज पार केले आणि लागोपाठ दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावला. यावेळी निनाद स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे एकविरा भगवती संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच, या स्पर्धेत जाखमात चौल या संघाने तृतीय क्रमांक, तर क्लासिक कनेक्ट या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. तसेच, या स्पर्धेत सामनावीर रत्नेश वर्तक हा ठरला असुन उत्कृष्ट फलंदाज तरंग व उत्कृष्ट गोलंदाज सार्थक पिटनाईक हे ठरले. विजेत्या संघांना आणि उत्कृष्ट खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

तसेच, या स्पर्धेदरम्यान जान्हवी तळे क्रीडा मंडळातर्फे खास महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. त्याला येथील महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विजेत्या दोन महिलांना शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या तर्फे आकर्षक बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जान्हवी तळे क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच, या स्पर्धेचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल विनय म्होत्रे व सहकार्यांचे चौल पंचक्रोशीतून कौतूक करण्यात आले.







