निक्षय मित्र ठरणार रुग्णांसाठी वरदान

| अलिबाग | प्रतिनिधी |

क्षयरोग मुक्तीसाठी रायगड जिल्ह्यामध्ये आता निक्षय मित्रांची मदत घेतली जाणार आहेत. या मित्रांच्या मदतीने रुग्णांपर्यंत पोहचून त्यांच्यावर योग्य उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात शंभर निक्षय मित्र असून हे मित्र क्षयरुग्णांसाठी वरदान ठरणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील क्षय रुग्ण शोध मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाते. जिल्ह्यात 16 पथके कार्यरत आहेत. जिल्ह्यात 62 सुक्ष्म दर्शी केंद्र आहेत. या केंद्राच्या माध्यमातून संशयीत रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेणे, एक्सरे काढणे अशा अनेक प्रकारची कामे केली जातात. जिल्हयात वीस वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक असून 11 वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आहेत. यांच्यामार्फत रुग्णांवर वेळेवर उपचार करणे. त्यांची तपासणी करणे अशा अनेक प्रकारची कामे केली जातात. बाधीत रुग्णांना वेळोवेळी गोळ्या वाटप करून त्यांची दर पंधरा दिवसांनी विचारपूस केली जाते. यामध्ये अंगणवाडी सेविका व आशा वर्करचा सहभाग आहे. क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी निक्षय मित्र योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कोणतीही स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था किंवा संघटना, राजकीय पक्ष किंवा कोणतीही व्यक्ती क्षय रुग्णाला दत्तक घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करणार आहेत. जिल्हयामध्ये 100 निक्षय मित्र असून या मित्रांची मदत क्षयमुक्तीसाठी होणार आहे.

जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाला जागेची प्रतिक्षा
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय कार्यरत होते. ही इमारत जीर्ण झाल्याने ती इमारत तोडून जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय शहरातील श्रीबागमध्ये एका खासगी इमारतीमध्ये गेल्या पाच वर्षापुर्वी स्थलांतरीत केले. गेल्या अनेक वर्षापासून क्षयरोग अधिकारी कार्यालय जागेच्या प्रतिक्षेत आहे. अलिबाग येथील जिल्हााधिकारी कार्यालयाकडे कार्यालयासाठी जागा मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. मात्र गेली अनेक महिने उलटूनदेखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा उपलब्ध झाल्याचे समोर आले आहे. एका बाजुला जिल्ह्यातून क्षयमुक्ती करण्यासाठी क्षयरोग अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व अन्य संस्था काम करीत असताना, दुसऱ्या बाजुला हे कार्यालय हक्काच्या जागेसाठी वणवण करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Exit mobile version