70 घरांना दरडीचा धोका
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील धोकादायक इमारती आणि घरांचे सर्वेक्षण पालिकेने केले आहे. त्यात विविध भागातील नऊ इमारती आणि 99 घरे धोक्कादायक ठरविण्यात आली आहेत. त्याचवेळी शहरातील मुद्रे भागात मागील वर्षांपासून दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे त्या भागातील आणि अन्य भागातील 70 घरे दरडीच्या छायेत असल्याचे जाहीर करण्यात आली आहे. कर्जत नगरपालिका हद्दीत सर्व धोकादायक इमारतींमधील कुटुंबांना तात्कळ स्थलांतरण करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. नगरपालिकेकडून त्या इमारतींवर धोकादायक असे फलक लावण्यात आले आहेत.
कर्जत या 1992 मध्ये नगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या शहरात पूर्वी ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायत असताना कर्जत शहरात पूर्वी मोठ्या प्रमाणात वाडे होते. तर, काही प्रमाणात तीन मजल्याच्या इमारती होत्या. आता वाडे पाडले जाऊन मोठे टॉवर उभे राहात आहेत. मात्र, आजही शहरात मोठ्या काही जुन्या दुमजली इमारती असून, त्यांचे आयुष्यमान संपल्याने त्यांना कर्जत नगरपालिकेने धोकादायक ठरवले आहे. पालिकेने मागील चार महिने शहरातील सर्व जुन्या इमारती पालिकेने नेमलेल्या पथकाने केली. त्या पथकात शहर अभियंतेदेखील होते. त्यानुसार अहवाल तयार करण्यात आल्यानंतर कर्जत नगरपालिका हद्दीमधील नऊ इमारती या धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. त्याचवेळी शहरातील 99 घरेदेखील धोकादायक स्थितीत असल्याने त्यांना धोकादायक ठरविण्यात आले आहे. त्या सर्व घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे पत्र आणि नोटीस पालिकेने बजावली आहे.
नगरपालिकेने ज्या नऊ इमारती धोकादायक ठरविल्या आहेत, त्यामध्ये पिंपुटकर वाडा-दहिवली, नाझ व्हिला-दहिवली, तर मुख्य शहरातील तेलवणे बिल्डिंग, डागा बिल्डिंग, भुसारी चाळ, गुजराथी वाडा, प्रेमसिंधु अपार्टमेंट यांचा समावेश आहे. या सर्व इमारतींमध्ये 62 नागरिक राहात असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची नोटीस पालिकेने बजावली आहे. मागील वर्षांपासून दरडीच्या छायेत असलेल्या कुटुंबांनादेखील दरडी कोसळून अपघात होण्याचा धोका असल्याने नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. त्यात यावर्षी काही घरांची वाढ झाली असून, 70 घरांना दरडीच्या छायेत असल्याबद्दल नोटीस बजावली आहे. त्या सर्व सूचना धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना कर्जत नगरपालिकेने दिल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिली आहे. त्याचवेळी कर्जत पालिकेने धोकादायक ठरविण्यात आलेल्या इमारतींच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.