रायगड पोलीसांनी 24 तासात आवळल्या मुसक्या
। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
भर रस्त्यात मंगेश काळोखे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार करण्यात आले होते. ही घटना शुक्रवारी (दि.26) सकाळी घडली होती. या घटनेचा तपास करून रायगड पोलिसांनी नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील पाच पथकांमार्फत आरोपींचा वेगवेगळ्या मार्गाने शोध घेण्यात आला आहे .
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली परिसरातील रहाटवडे येथील रहिवासी असणारे सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे हे शुक्रवारी सकाळी खोपोली येथील शिशु मंदिर स्कुलमध्ये मुलीला सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते परत येत असताना खोपोलीमधील विहार येथील जया बार चौकात आल्यावर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काही मारेकऱ्यांनी कोयता, तलवार व कुऱ्हाड या धारदार शस्त्रांनी वार करून काळोखे यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. त्यांच्या शरीरावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सामाजिक व राजकीय दृष्टया हा गुन्हा अतिसंवेदनशील होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक आंचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे, खोपोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे, खालापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, रसायनीचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर, नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वरोटे व त्यांच्या पथकाने वेगवेगळ्या मार्गाने शोध सुरू केला. या दरम्यान, मारेकऱ्यांनी मोबाईल फोन बंद करून ठेवला होता. मात्र, ते मुंबई व अन्य ठिकाणी पळून गेल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींच्या ठाव ठिकाणाची निश्चित माहिती नव्हती. अखेर पथकाने मोठ्या कौशल्याने मारेकऱ्यांचा शोध घेतला. निघृण हत्या करून पसार झालेले व मदत करणारे रविंद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, उर्मिला देवकर, विशाल देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन खराडे, दिलीप पवार या नऊ जणांच्या मुसक्या 24 तासात आवळण्यात रायगड पोलीसांना यश आले.
राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.
