कर्जतमधील ‘ही’ गावे आहेत डेंजरझोनमध्ये; नागरिकांसाठी ‘या’ ठिकाणी केली राहण्याची सोय

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका डोंगर उताराचा भाग असल्याने तालुक्याच्या अनेक भागात दरडी कोसळण्याची शक्यता असते; तर डोंगर भागामुळे नद्यांना पूर येण्याची देखील अनेक उदाहरणे आहेत. मागील काही वर्षातील अनुभव लक्षात घेता कर्जत तालुक्यातील संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. दरम्यान,कर्जत तालुक्यातील 9 गावे ही पूरग्रस्त गावे असून तीन गावे दरडग्रस्त गावे आहेत. या पार्श्‍वभूमीवर संभाव्य परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाने आपत्तीवर मात करण्याचे नियोजन केले आहे.

कर्जत तालुक्यात दरवर्षी साधारण 3500 मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र गेली काही वर्षे पावसाळ्यात सातत्याने महापूर येऊन गावांमध्ये नदीचे पाणी शिरल्याने घरातील साहित्यांचे मोठे नुकसान होते. डोंगराच्या पायथ्याशी घरे असलेल्या कुटुंबांना दरडीचा धोका निर्माण होतो. त्यामुळे कर्जत तालुका प्रशासनाने तालुक्यातील संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे.
तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात तालुक्यात दरवर्षी पावसाळयात येणारा महापूर लक्षात घेऊन त्या गावांचा समावेश पूरग्रस्त गावांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.तालुक्यातील कर्जत शहर, दहिवली, नसरापूर, आकुर्ले, कळंबोली, माळवाडी, एक्सळ आणि वावे ही गावे पूरग्रस्त गावे म्हणून आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात समाविष्ट असताना त्या ठिकाणी यावर्षी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास त्या गावांमधील रहिवासी यांची व्यवस्था समाजमंदिर येथे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर कर्जत शहरातील आकुल, दहिवली आणि बाजारपेठ भागात महापूर आल्यास त्या भागातील रहिवाशांची तात्पुरती निवारा व्यवस्था रॉयल गार्डन हॉटेल येथे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यात तीन गावे दरडीच्या छायेत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खांडपे ग्रामपंचायतमधील सांगवी गाव, कर्जत शहरातील मुद्रे आणि आसल ग्रामपंचायत मधील पाली-भूतीवली गावांचा समावेश आहे. त्या सर्व ठिकाणी पावसाळ्यात पावसाचा सतत संततधार सुरु असल्यास त्या तीन गावांतील लोकांची राहण्याची व्यवस्था सांगवी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात तर कर्जत मुद्रे येथील नागरिकांची तात्पुरता व्यवस्था रॉयल गार्डन हॉटेलमध्ये आणि पाली भूतीवली गावातील ग्रामस्थांची व्यवस्था डिकसळ गावातील शाळेत करण्यात आली आहे.

आगामी काळातील पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडयात कर्जत तालुक्यातील पाझर तलाव आणि धरणांच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. त्यात तालुक्यातील डोंगरपाडा येथील पाझर तलाव 8 वर्षांपूर्वी पावसाळ्यात फुटले होते आणि मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तालुक्यातील पाथरज, खांडस, खांडपे, कशेळे, साळोख येथील पाझर तलाव हे किमान तीन वर्षापूर्वीचे आहेत. त्यामुळे मातीचे बांध फुटून कोणताही अपघात होऊ नये, यासाठी त्या सर्व पाझर तलाव आणि अवसरे तसेच पोळी-भूतीवली येथील धरणांची सद्यस्थिती आपत्ती व्यवस्थापनमधील अभियंते यांच्याकडून करण्यात आली आहे, अशी माहिती तहसील कार्यालयाने दिली आहे.

तालुक्यातील पूरग्रस्त गावे-
नसरापूर-नसरापूर ग्रामपंचायत,
दहिवली नीड, आकुर्ले-कर्जत नगरपरिषद,
एकसळ-चिंचवली ग्रामपंचायत,
माळवाडी-वावळोली ग्रामपंचायत
वावे -उमरोली ग्रामपंचायत

दरडग्रस्त गावे-
सांगवी -खांडपे ग्रामपंचायत,
मुद्रे- कर्जत नगरपरिषद,
पाली-भूतीवली-आसल ग्रामपंचायत

आगामी पावसाळयात पूर आणि सतत पाऊस सुरु राहिल्यास दरडी कोसळण्याची संभाव्य भीती लक्षात घेऊन आम्ही नियोजन केले आहे. त्यात कर्जत तालुक्यात भयानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तसेच हवाई मदत आवश्यक असल्यास कर्जत येथे हेलिपॅड तयार ठेवण्यात येणार आहे. याशिवाय असताना माथेरान मध्ये काही परिस्थिती उद्भवल्यास माथेरानमध्ये देखील हेलिकॉप्टर उतरवण्याची व्यवस्था असेल.

विक्रम देशमुख- तहसीलदार कर्जत
Exit mobile version