। मुंबई । वृत्तसंस्था ।
संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली झाली. आज त्यांची कोठडी संपली त्यामुळे त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी नितेश यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. न्यायालयानं १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. पोलिस कोठडी संपली तरी आता त्यांचा मुक्काम कोठडीत असणार आहे. आज जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार होता.
सिंधुदुर्गातील शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी मुख्य आरोपीला दिल्लीवरून अटक केली होती. त्यानंतर संशयाची सुई नितेश राणेंभोवती फिरत होती. त्यांना अटक करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरली होती. त्यांना चौकशीसाठी बोलावले असता ते हजर झाले नाहीत. पोलिस त्यांचा शोध घेत होते. पण, नितेश राणे कुठे होते? हे कोणाला माहिती नव्हते. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना न्यायालयाला शरण येण्यास सांगितले.
नितेश राणेंना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजून युक्तीवाद करण्यात आला. आमची चौकशी अजून पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे नितेश राणेंची पोलिस कोठडी वाढवून द्या, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. आता न्यायालयानं त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पण, राणेंकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. पण, ही प्रक्रिया किती वेळ घेणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही, असं राणेंच्या वकिलांकडून सागंण्यात आले आहे.