नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; एडलवाईज विरोधात गुन्हा दाखल

नेहा देसाई यांची खालापूर पोलिसात तक्रार

| रायगड | खास प्रतिनिधी |

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी इसीएल फायनान्स कंपनी/एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांच्याविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याबाबतची तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिली.

नितीन देसाई यांच्या डोक्यावर तब्बल 250 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्याच्या वसुलीसाठी इसीएल फायनान्स कंपनी/एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला होता. त्याच्या त्रासाला कंटाळूनच नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे नेहा देसाई यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. नितीन देसाई यांनी काही कारणांनी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या दोन वर्षांत कर्जाचा करारनामा झाला होता. यासाठी देसाई यांनी विविध सर्व्हे नंबर असलेल्या तीन मालमत्ता (26 एकर, 5-89 एकर आणि 10.75 एकर) तारण ठेवल्या होत्या. काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाती एडलवाईस ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. परंतु, कर्जाची वसुली होत नव्हती. 180 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले होते. मात्र, व्याजासह 3 मे 2022 पर्यंत सदर कर्जाची रक्कम सुमारे 249 कोटी रुपयांवर पोहोचली होती.

कर्जाच्या वसुलीसाठी नितीन देसाई यांच्याकडे इसीएल फायनान्स कंपनी/एडलवाईज ग्रुपने तगादा लावला होता. त्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. इसीएल फायनान्स कंपनी/एडलवाईज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीमध्ये इसीएल फायनान्स कंपनी/एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांच्यासह अन्य अशा पाच जणांचा समावेश आहे.

कलम 306 काय आहे?
306 आत्महत्तेस प्रवृत्त करणे, त्रास देऊन आत्महत्या करायला लावणे, सदरील गुन्ह्यात 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, तसेच दंड करण्याचीदेखील तरतूद आहे. सदरील गुन्हा दखलपात्र या गटात मोडत असल्याने यात पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत.

कलम 34 काय आहे?
जेव्हा एक गुन्हेगारी कृत्य सर्व व्यक्तींद्वारे समान हेतूने केले जाते, तेव्हा प्रत्येक व्यक्ती अशा कृत्यासाठी जबाबदार असते, जणू तो गुन्हा त्याने एकट्यानेच केला आहे.

Exit mobile version