अरे बापरे! ऊर्जामंत्र्यांनी दिला राज्यातील जनतेला शॉक

। मुंबई । वृत्तसंस्था ।
वीज मागणीत झालेली अभूतपूर्व वाढ, कोळशाच्या टंचाईमुळे राज्यात वीजसंकट निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी, वीज बिल भरुन सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. ज्या ठिकाणी वीज चोर्‍या वाढल्या आहेत, त्या ठिकाणी भारनियमन केले जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

ज्या ठिकाणी वीजचोरी, वीज वितरण हानी आणि बिलाची वसुली कमी आहे अशा ठिकाणी आम्ही लोडशेडिंग करू. यामध्ये G1, G2 आणि G3 श्रेणीतील ग्राहकांचा समावेश आहे, जे बहुतांशी मुंबई महानगर भागातील कल्याण भागात आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई वगळता विदर्भ, मराठवाडा, खान्देश जिल्ह्यातील नागरिकांना लोडशेडिंगचा फटका बसणार आहे. काही शहरी भागात जरी आम्ही भारनियमन करत असू, तरी दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवू, असंही राऊत यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, राज्यात ऊन तापत असल्याने घरगुती वीज वापरासह औद्योगिक व कृषिपंपाचा वीजवापरदेखील वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी विक्रमी 28 हजार मेगावॅटच्या घरात गेली आहे. मुंबईत सुमारे 3200 ते 3500 मेगावॉट विजेची मागणी आहे. मुंबई वगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यःस्थितीत मागील वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत चार हजार मेगावॅटने वाढ झाली आहे.

पंधरा दिवसांपासून ‘महावितरण’कडील विजेची मागणी सातत्याने 24 हजार 500 ते 24 हजार 800 मेगावॅट दरम्यान आहे. विजेच्या मागणीचा चढता आलेख लक्षात घेता ही मागणी लवकरच 25 हजार 500 मेगावॉटवर जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी रात्रीच्या कालावधीतदेखील मागणी 22 हजार 500 ते 23 हजार मेगावॅट आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणच्या औष्णिक वीजनिर्मितीत घट झाली आहे. काही औष्णिक संच देखभाल व दुरुस्तीसाठी बंद आहेत. परिणामी, महावितरणला औष्णिक वीजनिर्मितीकडून तब्बल 6000 मेगावॅटने कमी वीज उपलब्ध होत आहे.

Exit mobile version