| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांसाठी देण्यात आलेल्या भूखंडावर पुष्पक नगर ही नवी वसाहत तयार होत आहे. पुष्पक नगर हे नियोजित शहर आकार घेत असताना या ठिकाणी नागरिकांना समस्या भेडसावत आहे ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची. विमानतळानजीक असलेल्या शहराचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे भविष्यात येथील नागरिकीकरण झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे येथे एमएमएमटीची बससेवा सुरु करण्यासाठी दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेमार्फत एनएमएमटी बस सेवा पुष्पक नगरसाठी सुरु करावी, असे निवेदन संस्थेचे अध्यक्ष सुनील कटेकर यांनी मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात दिले. ते वाचल्यावर लगेचच त्यावर सकारात्मक भूमिका घेत त्यांनी येथे उपस्थित असलेल्या एनएमएमटीच्या पदाधिकाऱ्यांना त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
यावेळी एनएमएटीचे अधिकाऱ्यांनीही यावेळी सकारात्मक प्रतिसाद लवकरच याबाबत पाऊले उचलण्याचे आश्वासित केले. नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत सुरु असलेल्या एनएमएमटीच्या बससेवेचा लाभ बहुसंख्य पनवेलकरांना होत आहे. ही सेवा पनवेलकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. दापोली, श्रीरामनगर परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांना विमानतळ प्राधिकरण पुष्पकनगर नोड विकसित करीत आहे. येथील नागरिकीकरण झपाटयाने वाढणार आहे. मात्र या ठिकाणाहून रहिवाशांना येण्याजाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक सेवा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नाहक भूर्दंड पडत आहे. तसेच या ठिकाणी भविष्यात येवू पाहणाऱ्या रहिवासीही या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवा नसल्याने फारसे उत्सुक दिसत नाहीत. तरी आपण या नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नाचा विचार करुन एनएमएमटी बस पनवेल, वडघर, करंजाडे, वरचे ओवळे, कॉलेज फाटा, टी पॉईंट, दापोली, श्रीराम नगर, मानघर, दापोली मार्गे पुष्पक नगर तसेच खांदेश्वर रेल्वे स्थानक, टी पॉईंट, दापोली, श्रीराम नगर, मानघर, कुंडेवहाळ, सेक्टर 3 तसेच बेलापूर, विमानतळ, वहाळ, गव्हाण फाटा, कुंडेवहाळ, श्रीराम नगर, मानघर, दापोली पुष्पकनगर अशा मार्गावर एनएमएटी सेवा सुरु करावी अशी मागणी दिशा बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आली.







