एनएमएमटीकडून पनवेलमधील प्रवाशांची अडवणूक!

| पनवेल ग्रामीण | दीपक घरत |

पालिका हद्दीतील खांदेश्वर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानका दरम्यानच्या मार्गांवर एनएमएमटीकडून 59 क्रमांकाची बस सेवा सुरु आहे. एनएमएमटी प्रशासनाकडून या मार्गांवरील बसच्या संख्येत घट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या मार्गांवर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी फरफट होत आहे. बस सेवा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. तशा स्वरुपाचे मेल देखील काही प्रवाशांनी एनएमएमटी प्रशासनाकडे केले आहेत.

पनवेल महापालिका हद्दीत गाड्या वाढविणे ही आमची प्राथमिक जबाबदारी नसून, नवी मुंबई पालिका हद्दीत बस सेवा सुरळीत ठेवण्याला आम्ही प्राथमिकता देत असल्याचे मत एनएमएमटी प्रशासनाचे महाव्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी व्यक्त केल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय सध्या तरी दूर होण्याची शक्यता धुसर झाली आहे. पालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून नवी मुंबई पालिकेच्या परिवहन विभागाकडून पनवेल परिसरातील सिडकोने विकसित केलेला भाग आणि इतर विभागात सार्वजनिक परिवहन सेवे मार्फत बससेवा पुरवली जात आहे. सध्या एनएमएमटी मार्फत पनवेलमधील 23 वेगवेगळ्या मार्गिकांवर बस सेवा पुरवली जात आहे. ही सेवा पुरवण्यासाठी एनएमएमटी विभागाला मोठा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती एनएमएमटी विभागाकडून देण्यात आली आहे. 2016 साली स्थापित पनवेल पालिकेची स्वतःची परिवहन सेवा नसल्याने नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेला होणारा तोटा भरून काढण्यात पनवेल पालिकेने हातभार लावावा असे म्हणणे एनएमएमटी प्रशासनाचे आहे.

एनएमएमटी अधिकाऱ्यांशी साधणार संपर्क
खानदेशवर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान धावणाऱ्या बस सेवेवर परिणाम झाला असल्यास याबाबत
एनएमएमटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्वतंत्र परिवहन सेवेसाठी पनवेल पालिकेचे प्रयत्न
2016 साली घोषित पनवेल पालिकेची स्वतःची परिवहन सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.या करता अहवाल तयार करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती पालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. एजन्सी कडून आलेल्या अहवाला नंतर एनएमएमटी विभागाला होणारी तूट भरून द्यायची आणि ती किती द्यायची याचा निर्णय घेणे शक्य होणार असल्याचे मत पनवेल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

बस सेवेसाठी होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी काही रक्कम पनवेल पालिकेने द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. स्वत:ची परिवहन सेवा सुरु करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.या करता एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. एजन्सी कडून अहवाला प्राप्त होताच एनएमएमटी विभागाला होणारी तूट भरून द्यायची आणि ती किती द्यायची याचा निर्णय घेणे शक्य होणार आहे.

कैलास गावडे
अधिकारी, पनवेल पालिका.

नवी मुंबई पालिका हद्दी बस सेवा नियमित ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी आमची आहे. त्या मुळे तसे प्रयत्न आम्ही करत आहोत. पनवेल पालिका हद्दीत बस सेवा पुरवण्यासाठी होणारा तोटा भरून काढण्यात पनवेल पालिकेने सहकार्य करावे जेणे करून बस सेवा पूर्ववत करणे आम्हाला देखील सोयीचे होईल.

योगेश कडूसकर,
महाव्यवस्थापक. एनएमएमटी

Exit mobile version