खड्ड्यांमुळे एनएमएमटीएल सेवा बंदचे संकेत

| नवीन पनवेल । वार्ताहर ।

खारघर आणि तळोजा परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे एनएमएमटीएलच्या वाहनांचे विविध भाग तुटून बस बंद पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या मार्गावरील वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करावी, असे पत्र आसूडगाव आगाराकडून पनवेल महापालिकेला देण्यात आले आहे.

तळोजा वसाहतीमधील प्रवासी संख्येत वाढ होत असल्याने नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेने खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज एक वसाहतीत एनएमएमटीएलची बस क्रमांक 52 बेलापूर ते तळोजा आणि घणसोली ते तळोजा फेज एक वसाहत 55 क्रमांकाची बस सेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज दोन वसाहत परिसरात 43, 45 क्रमांकाची बस; तर खारघर रेल्वे स्थानक ते शीघ्र कृती दल मार्गावरदेखील 54 क्रमांकाची बस खारघर वसाहत मार्गे तळोजा वसाहतमधील रस्त्यांवर धावत आहे; मात्र खारघर रेल्वे स्थानकाकडून खारघर वसाहत आणि तळोजा फेज एक आणि दोनमधील वसाहतींमधील रस्त्यांची चाळण झाल्याने अनेकदा बस बंद पडण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे या मार्गावरील रस्त्यांची कामे करावीत, असे पत्र आसूडगाव आगाराकडून पनवेल महापालिकेला देण्यात आले आहे.

तळोजा फेज दोन सिडको वसाहत आणि इतर सेक्टरमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात नोकरी आणि व्यवसायासाठी जाणार्‍यांची संख्या अधिक आहे; मात्र या फेजमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज एक तरी बस बंद पडत आहे. त्यामुळे लवकर रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर या मार्गावरील सेवा बंद करून पेंधर मेट्रो स्थानकापर्यंत सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.

तळोजा फेज एक आणि दोनमधील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज दोन मार्गावर 45 क्रमांकाची बस सुरू करण्यासाठी नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेसाठी पाठपुरावा केला होता, पण आता या रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करावेत यासाठी सिडको अधिकार्‍यांची भेट घेऊन रस्तेदुरुस्तीची मागणी करण्यात येईल.

अंकुश गायकवाड
अध्यक्ष, पनवेल शहर काँग्रेस

तळोजा फेज एक आणि दोन वसाहतीमधील रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. तसेच डांबरीकरणाच्या कामासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत डांबरीकरणाचे काम सुरू केले जाईल.

मिलिंद म्हात्रे
कार्यकारी अभियंता, सिडको
Exit mobile version