तीन वाहनांकडून दहा लाखांचा दंड वसूल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी सात एप्रिलच्या मध्यरात्री केलेल्या कारवाईमध्ये जप्त केलेल्या लाल मातीच्या गाड्यांना दंड ठोठावला होता. त्या तीन वाहनांच्या मालकांकडून दहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून, अन्य कारवाई न केलेल्या एक जेसीबी आणि आठ ट्रकमधीलसात गाड्या रिकाम्या होत्या, तर दोन गाड्यांचे चालक तेथून पळून गेल्याने कारवाई करता आली नाही, असा खुलासा तहसीलदारांनी केला आहे.
सात एप्रिलच्या रात्री आणि आठ एप्रिलच्या पहाटे कर्जत तहसीलदारांनी लाल मातीची तस्करी करणार्या वाहनांवर कारवाई केली होती. त्यावेळी त्यांनी स्वतः तीन ट्रक थांबवून त्यांना कशेळे येथे पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्या ट्रकचालकांनादेखील पोलिसांनी कारवाई सुरू असताना कशेळे येथील पोलीस आऊट पोस्टमध्ये बसवून ठेवले होते. त्या लाल मातीने भरलेल्या तीन ट्रकवर कर्जत तहसील कार्यालयाने दंडात्मक कारवाई केली. आठ एप्रिलपासून ते ट्रक कर्जत तहसील कार्यालयाच्या बाहेर उभे होते. त्या तीन ट्रकच्या मालकांकडून लाल माती आणि वाहन यांच्यावर महसूल अधिनियम अंतर्गत कारवाई केली.त्या कारवाईत लाल माती उत्खननासाठी तीन हजार रुपये दंड तसेच महसूल विभागाने लावलेल्या दंडाच्या पाच पट रक्कम लावण्यात आली. तसेच पकडण्यात आलेल्या ट्रकसाठी दोन लाख असे एका वाहनाकडून दोन लाख 23 हजार एवढी रक्कम महसूल विभागाने वसूल केली आहे. त्या तीन वाहनांची अद्याप महसूल विभागाकडून सुटका झालेली नसून, तहसीलदार कार्यालयाने कारवाई केलेली दंडात्मक रक्कम त्या ट्रक मालकांनी भरली आहे. मात्र, तहसील कार्यालयाचा अहवाल प्रांत अधिकारी कार्यालयाकडे गेल्यावर प्रांत अधिकारी हे पोलिसांना आदेश काढतील आणि त्यानंतर कर्जत पोलीस ठाणे बाहेर असलेली लाल मातीने भरलेली वाहने वाहन मालकांना परत मिळणार आहेत, अशी माहिती तहसीलदारांनी दिली.
कारवाई करण्यात आलेले ट्रक
एम एच 46- ए आर 6590, मालक विनोद पाटील तळेगाव खालापूर, चालक अजय काळूराम ठाकूर, एम एच 46- बी एफ 9699, मालक दर्शन मांडे, तळेगाव खालापूर,चालक व्यंकटेश राठोड, 3-एम एच 46 एफ 4453 मालक जिग्नेश ठाकूर चावणे पनवेल,चालक राजेश यादव.
महसूल विभागाचे कर्मचारी चिमटेवाडी चिंचवाडी येथे गेले असता तेथे सातही ट्रक आढळून आले नाहीत. मात्र, त्या सर्व पळून गेलेले ट्रक हे पुन्हा कर्जत तालुक्यात लाल मातीची वाहतूक करताना आढळल्याने मोठी कारवाई करण्याचे आदेश महसूल विभागाचे सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना दिलेले आहेत.
डॉ. धनंजय जाधव,
तहसीलदार