मुरूड ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

शवविच्छेदनासाठी डॉक्टरच नाहीत

| मुरुड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील काशिद आदिवासी वाडी येथे एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आदिवासी समाजाच्या मृत व्यक्तीचा मृतदेह मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मात्र, शवविच्छेदनासाठी डॉक्टरच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुरूड ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुरूड तालुक्यातील काशिद आदिवासी वाडी येथील एक व्यक्ती मजुरीच्या कामासाठी घराबाहेर पडली होती. मात्र ती व्यक्ती रात्रभर घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. सकाळी पत्नीने व नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता, त्या व्यक्तीचा मृतदेह एका नाल्यात आढळून आला. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मात्र, येथेच एक धक्कादायक वास्तव समोर आले. सकाळी साधारण 11 वाजता मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर, शवविच्छेदनासाठी कोणताही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे नातेवाईक हादरून गेले. मृत व्यक्तीचे नातेवाईक अंकुश पवार (काशिद) यांनी आदिवासी कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष भगवान शंकर नाईक यांना फोन करून ही गंभीर बाब सांगितली. तर भगवान नाईक यांनी स्वतः डॉक्टरांशी संपर्क साधला असता, “इथे शवविच्छेदन करण्यासाठी कोणीच नाही, तुमच्याकडे कोणी डॉक्टर असेल तर पाठवा,” असे उत्तर डॉक्टरांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांवर आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, शवविच्छेदनाअभावी मृतदेह तासन्‌‍‍तास तसाच पडून राहणे हे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे भयावह चित्र आहे. या घटनेमुळे मुरूड ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

एवढ्या मोठ्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी शवविच्छेदक नाहीत. ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. मृत व्यक्तीचे नातेवाईक सकाळपासून मृतदेहाजवळ बसून आहेत. मरण सुद्धा आता सोपं राहिलेलं नाही.

– भगवान नाईक, अध्यक्ष-आदिवासी कातकरी समाज संघटना

शवविच्छेदकाअभावी मृतदेह तासन्‌तास तसाच
या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने ग्रामीण रुग्णालयशी संपर्क साधला असता वैद्यकीय अधिकारी प्रफुल्ल धुमाळ यांनी सांगितले की, मृतदेह 11 वाजताच्या सुमारास आला. पोलिसांनी पंचनामा करून 2 वाजता ताब्यात दिला. परंतु, शवविच्छेदन करण्यासाठी (कटर) म्हणजे शवविच्छेद्क पोस्ट खाली असल्याने मृतदेह तासन्‌तास तसाच पडून होता. त्यांनतर अलिबाग जिल्हा रुग्णालयातून शवविच्छेदक (कटर) मागविण्यात आला. संध्याकाळी 6 वा. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
Exit mobile version