। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल आणि खारघरमधील धबधब्यांवर तसेच धरणांवर दुर्घटना घडत असल्याने या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात धबधब्याजवळ जाऊ नये, असे आवाहन परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्रात सध्या पावसाने जोर धरला असला तरी खरा पाऊस जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अनेकवेळा पर्यटक विशेषत: तरुणवर्ग पनवेल आणि खारघर भागातील धबधबा तसेच धरणांजवळ मौजमजा करण्यासाठी जात असतात. मात्र, काही वेळेला ते सदर ठिकाणी दुर्घटना होऊन आपला जीव गमावून बसतात. गेल्या काही वर्षांमध्ये पनवेल आणि खारघरमधील धबधब्यांवर अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. खारघरव्यतिरिक्त पनवेलमध्ये अनेक छोटे-छोटे धबधबे आणि धरण आहेत.
या धबधब्यांवर मौजमजा करण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात. त्यामुळे या धबधब्यांचे मुख्य रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी अनेक तरुण दुसर्या मार्गाने डोंगराळ भागातून धबधब्याजवळ जात असतात. अनेक वेळा काही तरुण दिवसा उजेडात जातात, त्यानंतर ते रात्रीच्या अंधारात हरवून जातात. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना जावे लागते. त्यामुळे सर्व धबधब्याच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले असून, धबधब्याजवळ पर्यटक पोहोचू शकतील अशा सर्व मार्गांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. जर कोणी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात धबधब्यावर जाऊ नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे.