| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुलांची जडणघडण ही आपसूक घडत नाही. मुले सातत्याने अनुकरण करीत असतात. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात मुलांना अधिक गुण मिळावेत यासाठी पालकांचा खटाटोप असला तरी गुणांचा बागुलबुवा उभा न करता त्यांच्या अभिरूची व अभिव्यक्तीचा विचार करावा. पालकत्व ही एक साधना असून, सुजाण पालक होण्यासाठी कुठलाही मॅजिक फॉर्म्युला नसल्याचे प्रतिपादन सहकार भारतीचे रायगड जिल्हा मंत्री प्रा. मेघराज जाधव यांनी केले.
नचिकेता हायस्कूल, मुरुडतर्फे आयोजित फनफेअर व स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठवर मुख्य विश्वस्त मुग्धा दांडेकर, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, शिघ्रे मराठी शाळेचे केंद्रप्रमुख संजय झिराडकर, विश्वस्त आराधना दांडेकर, प्रा. योगेश तंटक, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा तरन्नुम फराश, रायगड जि.प. माजी सदस्य नम्रता कासार, शुभांगी तांबडकर, निकिता सुर्वे, जाहिद कादिरी कोथवीलकर, लसने आदी मान्यवर उपस्थित होते.
फनफेअर कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी व पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी, टाकाऊतून टिकाऊ पक्वान्न, मेहंदी, वेशभुषा आदी स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला. शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून हितेश सुतार व समृद्धी दिवेकर तर उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून स्वरा मसाल, ऑल राऊंड परफॉमर ऑफ द इअर म्हणून वेदांत दिवेकर, सुश्मिता दास यांना गौरविण्यात आले. तर अर्जुन हाऊस प्रथम, एकलव्य हाऊस द्वितीय व कर्ण हाऊसला तृतीय क्रमांकाचा चषक देण्यात आला.