खांडपे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अजब ठराव; घारे-थोरवे वादाला आणखी एक फोडणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील खांडपे या ग्रामपंचायतीमधील मुळगाव या गावातील विकासकामे करण्यासाठी कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांनी 45 लाखांचा निधी दिला होता. मात्र, सदर कामांचे ठराव देण्याचा विषय ग्रामसभेत आल्यानंतर असंख्य ग्रामस्थांनी ठराव देऊ नये, अशी भूमिका घेतली. हा विषय राजकारण म्हणून पुढे आला असून, सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे वादाला या ठरावाच्या निमित्ताने फोडणी मिळाली आहे. दरम्यान, 45 लाखांचा निधी नको असा ठराव ग्रामसभेत मंजूर झाला असून, या ठरावामुळे तालुक्यात वेगळी प्रथा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांची खांडपे ग्रामपंचायत वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. या ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रशासक सुशांत गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या ग्रामसभेत मुळगाव येथील ग्रामस्थ शिवाजी देशमुख यांनी चार विकासकामांसाठी देखभाल दुरुस्ती ठराव मागितला होता. त्यांचे पत्र ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी शरद ठाकूर यांनी वाचन केले. त्या पत्रात मुळगावमधील अंतर्गत रस्ता आणि गटार बांधकाम करणे, जिल्हा परिषद शाळेसाठी संरक्षण भिंत बांधणे, माणगाव येथील अंतर्गत रस्ता तयार करणे आणि तिवणे गावातील अंतर्गत रस्ता तयार करण्याचे काम कर्जत आ. महेंद्र थोरवे यांनी मंजूर केले आहे. त्या सर्व विकासकामांसाठी 45 लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र, त्या कामांसाठी ग्रामपंचायतीकडून ठराव मिळणे आवश्यक असतात. परंतु, त्या चारही विकासकामांचे ठराव शिवाजी देशमुख यांनी मागितल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला.
विकासकामांचा आराखडा बनवण्यासाठी आयोजित ग्रामसभेत मोठा गोंधळ झाल्यानंतर ग्रामस्थ महेंद्र घारे यांनी ठराव घेत ही सर्व विकासकामे करण्यासाठी आम्हाला कोणाचाही निधी नको, माझी ग्रामपंचायत माझा अभिमान याप्रमाणे आम्ही ती सर्व विकासकामे करण्यासाठी निधी आणू, परंतु कोणत्याही कामांसाठी ग्रामपंचायतीने ठराव देऊ नये, असा ठराव मांडला. हा ठराव मांडण्यात आल्याने पुन्हा गोंधळ झाला आणि शेवटी महेंद्र घारे यांच्या ठरावावर मतदान घेण्यात आले. शेवटी मतदानाने त्या चार विकासकामे करण्यासाठी ठराव देण्यात येऊ नये, हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्या ठरावाला रवींद्र घारे यांनी अनुमोदन दिले असून, हा ठराव विकासकामे करण्यापासून रोखणारा असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. आ. महेंद्र थोरवे यांच्याकडे माणगाव, मुळगाव, तिवणे गावातील ग्रामस्थांनी विकासकामांची मागणी केली होती. मात्र, आता त्या विकासकामांना ठराव देण्यात आले नाही आणि मोठा राजकीय कल्लोळ होण्याची शक्यता आहे. कदाचित हा विषय नागपूर विधिमंडळ अधिवेशनात चर्चेला येऊ शकतो.






