सुपेगाव-फणसाड रस्त्याची दुरुस्ती नाहीच

| कोर्लई | प्रतिनिधी |

पावसाळा ऐन तोंडावर येऊनही मुरुड सुपेगावमार्गे रोहा रस्त्यावरील सुपेगाव-फणसाड या मार्गाचे दुरुस्ती व डांबरीकरण अद्यापही झालेले नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम खात्याने व ठेकेदाराने तोंडाला पाने पुसली तर नाही ना, असा सवाल त्रस्त वाहनचालक व प्रवासी वर्गातून विचारला जात आहे. हा रस्ता खड्डेमय व अतिशय अरुंद असून विशेषतः सुपेगाव ते फणसाड प्रवेशद्वारापर्यंतचा अंदाजे 4 ते 5 किमीचा भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असून, अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्याच्या कामात संबंधित बांधकाम खाते ठेकेदाराने तसेच फणसाड अभयारण्य विभागाने रस्त्यालगत असलेली झाडेझुडपे साफ करण्यात आली आहेत; मात्र, मे महिन्याचा अखेरचा आठवडा सरत आला, पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात आले नाही. दरम्यान, कृषीवलच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराशी संपर्क साधला असता, मंगळवारी (दि.19) रस्त्यावरील खड्डे व डांबरीकरण काम करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, रविवार उजडला तरी रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या मंगळवारी काम सुरू करणार, असा संतप्त सवाल स्थानिकांमधून उपस्थित होत आहे.

Exit mobile version