गर्दुल्ले, भिकार्यांचा वावर वाढला;सुरक्षाव्यवस्था कुचकामी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत रेल्वे स्थानकात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून येथील सुरक्षाव्यवस्था कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.मंगळवारी कर्जत रेल्वेस्टेशन मध्ये उभ्या असलेल्या लोकलमध्ये महिला डब्यात घुसलेल्या एका गर्दुल्ल्याने महिला प्रवाशांकडे पैशाची मागणी केली.त्यावेळी महिलांनी नकार देताच त्यांनी अश्लिल भाषेत जोरात शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला.
मंगळवारी सकाळी 7.43 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणारी लोकल स्थानकात होती.स्थानकात उभ्या असलेल्या लोकलच्या मधल्या ठिकाणी असलेल्या महिलांच्या डब्यात एक दारुडा, गर्दुल्ला व्यक्ती शिरला. तो महिला प्रवाशांकडे पैशांची मागणी करायला लागला. डब्यातील इतर महिलांनी त्याला डब्यातून उतरायला सांगितले; पण तो काही उतरला नाही. उलट महिला प्रवाशांना अश्लिल शिवीगाळ करायला लागला.
त्यामुळे पोलीस मदतीसाठी महिला प्रवाशांनी गाडीबाहेर पाहिले असता त्यांना एकही पोलीस अथवा सुरक्षा कर्मचारी दिसला नाही. मागील चार पाच दिवसांपुर्वीही असाच एक प्रकार दुपारच्या सुमारास महिलांच्या डब्यात घडला होता. त्यावेळी एक गर्दुल्ला डब्यात शिरला आणि त्याने एका तरुणीच्या डोक्यात हाताने जोरात फटका मारुन पळ काढला. त्याने अचानकपणे जोरदार प्रहार केल्यामुळे तरुणी घाबरली व रडायला लागली. सदर घटनेदरम्यान कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या सदस्यांच्या पत्नी देखील डब्यात उपस्थित होत्या. त्यावेळी देखील कर्जत रेल्वे स्थानकावर एकही सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हता.
कर्जत रेल्वे स्थानकात भिकारी, गर्दुल्ले, दारुडे, चोर, लुटेरे यांचा राजरोसपणे वावर सुरू आहे. तो वावर थांबवावा. स्थानकात खोपोली व मुंबई दिशेकडे जाणारी लोकल उभी असल्यास लोकलच्या प्रत्येक महिला डब्यांच्या समोर एक सुरक्षारक्षक तैनात करावा. कर्जत रेल्वे स्थानकात भिकारी, गर्दुल्ले, दारुडे, चोर, लुटेरे यांचा होणारा शिरकाव कायमस्वरूपी बंद करावा. ह्या व इतर अनेक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनकडून करण्यात आली आहे.