रेल्वेमध्ये दैनंदिन तिकिटावर प्रवासबंदीच

। पुणे । वृत्तसंस्था ।
लसींच्या दोन मात्रा घेऊन पुणे-लोणावळा लोकलच्या प्रवासासाठी ओळखपत्र मिळविले तरी प्रवाशांना दैनंदिन तिकीट दिले जाणार नसल्याने प्रवासमुभा देऊनही हजारो प्रवासी त्यापासून वंचित राहत आहेत. मासिक पास घेतला, तरच संबंधितांना प्रवास करता येत आहे. फलाट तिकीट आणि पास देण्यासाठी स्थानकांवरील खिडक्या उघडया असताना केवळ दैनंदिन तिकिटासाठीच त्या बंद का, असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना यापूर्वीच रेल्वेच्या उपनगरीय गाडयांतून प्रवासमुभा देण्यात आली आहे. त्या वेळी सर्वासाठी दैनंदिन तिकीट देणे बंद करण्यात आले होते. सर्वासाठी उपनगरीय गाडयांच्या मागणीने जोर धरल्याने मुंबईतील उपनगरीय वाहतुकीची आवश्यकता लक्षात घेता लशींच्या दोन मात्रा घेतलेल्या आणि दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या सर्वसामान्यांना प्रवासमुभा देण्यात आली.उपनगरीय रेल्वेतून प्रवासमुभा देताना मुंबईनुसार पुण्यातही राज्य शासनाने आदेश काढले. तेच आदेश स्थानिक प्रशासनाने जसेच्या तसे लागू केले. लशींच्या दोन मात्रा घेतलेल्यांना स्थानिक प्रशासनाने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे उपनगरीय प्रवासासाठी मासिक, त्रमासिक पास देण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे. पुणे-लोणावळा रेल्वेचा लाभ घेणार्‍यांमध्ये दैनंदिन तिकिटावर प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या पासधारकांच्या तुलनेत मोठी आहे.

Exit mobile version