| मुंबई | वृत्तसंस्था |
महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रह दिनाला आज रिप्लब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. तत्पूर्वी त्यांनी महाड येथील विसावा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक राजकीय गोष्टींचा उलघडा केला. यावेळी त्यांनी लोकसभा आणि मोदींच्या विकासकामांची चर्चा केली. महाराष्ट्रात आम्हाला दोन जागा पाहिजेत, शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा आम्हाला युतीतून मिळणं गरजेचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
आरपीआय पक्ष छोटा असला तरी महाराष्ट्रात 2 जागा आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. राज ठाकरेंच्या निर्णयावर आम्हाला विश्वास नाही. आमच्या युतीत राज ठाकरे येणे अनपेक्षित, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे, असं म्हणत आठवलेंनी थेट उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरे अमित शहांना भेटून योग्य निर्णयाकडे वळलेत, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत. तसेच, एकदिवस राहुल गांधींनासुद्धा एनडीएमध्ये यावं लागेल, असं म्हणत रामदास आठवलेंनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे महायुतीला आगामी निवडणुकीत हमखास 45 जागा मिळतील, असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे.