ध्वनी प्रदूषणामुळे गुदमरतोय पक्षांचा जीव

कर्णकर्कश आवाजामुळे पक्षांचे स्थलांतर
। पनवेल । संजय कदम, साहिल रेळेकर ।
पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर अतिशय सुंदर रमणीय व विविध प्रकारच्या पक्ष्यांनी समृध्द असे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. निरनिराळ्या पक्षांच्या प्रजाती याठिकाणी आढळतात त्यामुळे इथल्या निसर्गरम्य ठिकाणी वर्षभर मोठया प्रमाणात पर्यटक येत असतात. परंतु ध्वनी प्रदूषणामुळे पक्षांना होणारा त्रास यामुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. जेव्हा आवाजाची तीव्रता त्रासदायक होते तेव्हाच त्याला कर्णकर्कश्य म्हणतात. अनेक मानवनिर्मित यंत्रांद्वारे हा त्रासदायक आवाज निर्माण होतो. कर्नाळा अभयारण्यातील पक्षांचा जीव कर्नाळा भागात असलेल्या रिसॉर्ट आणि फेब्रिकेशनच्या कामामुळे गुदमरतोय. यामुळे अभयारण्यातील अनेक पक्षांना त्यांचे वन्य जीवन जगणे कठीण झाले असून ते अन्य ठिकाणी स्थलांतरित होताना दिसतात.


कर्नाळा किल्ल्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत चिंचवणच्या हद्दीत सर्वे नंबर 51/02 मध्ये जशन फार्म रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये मोठमोठे सोहळे व डी.जे. पार्ट्या होत असून पहाटेपर्यंत येथे धांगडधिंगाणा सुरु असतो. कर्कश आवाजात साऊंड सिस्टीम सुरु असते त्यामुळे त्याचा रात्रीच्या निरव शांततेत आवाज संपूर्ण कर्नाळा अभयारण्यात घुमत असल्याने येथील पक्ष्यांवर सुद्धा परिणाम होतात. त्याच प्रमाणे सर्वे नंबर 40/1 मध्ये डी. एस. इंजिनीयरिंग वर्क्स कंटेनर, ग्लोबल कंटेनर टर्मिनल यामध्ये कंटेनर रिपेरिंग काम अहोरात्र सुरु असते या घणाघाती आवाजामुळे देखील येथील पक्षांना त्रास होत आहे. या कंटेनर यार्डच्या कामामुळे आवाजासहित हवेत लोखंडी कणही पसरत असल्याने अनेक पक्षांना श्‍वसनाचा त्रास होत असल्याचे पक्षीप्रेमींकडून बोलले जात आहे. या कंटेनर यार्डचे काम अहोरात्र सुरु असल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांना रात्री मोठ्या आवाजाचा त्रास होत असून अनेकांनी शासनाकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र या कंटेनर यार्ड व जशन फार्मच्या मालकांचे आर्थिक हितसंबंध असल्याने यांच्यावर कारवाई होत नसल्याचे येथील स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.


अनेक प्रजातीचे पक्षी त्यांच्या अधिवासात मानवी वर्दळ वाढली अथवा ध्वनी प्रदूषण वाढले, तर ते प्रदेशच सोडून जातात. अर्थात ही समस्या सर्वत्र उद्भवली तर अशा पक्ष्यांची संख्या घटत जाऊन त्यांचे अस्तित्व संकटात येते. तणावामुळे त्यांच्या प्रजनन शक्तीवर विपरित परिणाम होतो. अनेक प्रजातीचे पक्षी हे फुलाचे परागीभवन तसेच बिजप्रसार घडवून आणत असतात. अशी वनस्पती वृक्षाच्या बीजप्रसारात खंड पडून त्या परिसरात विशिष्ट वनस्पतींची पुनरूज्जीवन थांबते. ध्वनी प्रदूषणाचे पक्षांवरसुद्धा परिणाम होतात हे अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनाद्वारे दाखवून दिले आहे. कर्नाळा येथे जशन फार्मला मर्यादित डेसिबलपेक्षा अधिक मोठमोठ्या आवाजात डी.जे. लावण्याची परवानगी कोणी दिली आहे का? या रिसॉर्टकडे फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज परवाना आहे का? सांडपाण्याची व्यवस्था कशी केली आहे? घनकचर्याची विल्हेवाट कशी लावली जाते? या घन कचर्यामुळे जशन फार्म अ‍ॅण्ड रिसॉर्ट प्रदूषण करीत आहे त्यांवर प्रशासन, प्रदूषण नियंत्रण महामंडळ कारवाई कधी करेल? असे प्रश्‍न येथील ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. ध्वनी, वायू प्रदूषण, जलप्रदूषण करणार्या जशन फार्म रिसॉर्ट व डी.एस. इंजिनिअरिंग वर्क्स यांच्यावर संबंधित विभागाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व पक्षी प्रेमींकडून होत आहे.

Exit mobile version