| यवतमाळ | वृत्तसंस्था |
यवतमाळमध्ये जागा राखण्यासाठी रस्सीखेच केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी उमेदवार जाहीर केले खरे, पण यातला हिंगोलीचा उमेदवार बदलून यवतमाळमध्ये जो बदल केलाय त्यामुळे आता नवा पेच निर्माण झाला आहे. पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळींच्या जागी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेतील बंडाला साथ देऊन भावना गवळींनी शिंदेंचं पारडं जडं केलं खरं पण रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांना हक्काची लोकसभेची जागाही गमवावी लागली.
भावना गवळींच्या जागी ज्या उमेदवाराला संधी दिली जातेय त्या उमेदवाराविरोधात काही शिवसैनिकही मैदानात उतरलेत आणि झेडपीला पराभव झालेल्या उमेदवाराला खासदार कसं करायचं असा प्रश्न विचारला आहे. यवतमाळ-वाशिमसाठी उमेदवार जाहीर होताच भावना गवळी समर्थकांनी राजश्री पाटलांना विरोध सुरू केला आणि पार्सल उमेदवार परत पाठवू अशी भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीत डिपॉझीट जप्त झालेल्या उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी दिल्याचीही टीका सुरु झाली आहे कारण ज्या राजश्री पाटलांचं नाव निश्चित झालंय त्यांचा यवतमाळ वाशिममध्ये फारसा परिचय नाही.
राजश्री पाटील या खासदार हेमंत पाटलांच्या पत्नी आहेत. हिंगोलीतून हेमंत पाटलांना डावललं, पण राजश्री पाटलांना यवतमाळ-वाशिमधून संधी देण्यात आली. वाशिम हे राजश्री पाटलांचं माहेर तर हिंगोली सासर आहे. मात्र, अनेक वर्षांपासून राजश्री पाटील नांदेडमधील सामाजिक कामात सक्रिय आहेत. महिला अर्थ साक्षरता, महिला सबलीकरण, बचत गट, शिक्षण संस्था आणि सहकारी बँकेच्या माध्यमातून राजश्री पाटलांनी सामाजिक कामात झोकून दिले आहे. 2012 ला पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला होता.