बिगर-भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे एकजुटीचे प्रयत्न सुरू

। मुंबई । वृत्तसंस्था ।
बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रविवारी मुंबईत येणार आहेत. भाजपविरोधात समविचारी पक्षांना संघटित करण्याबरोबरच पुढील दिशा निश्‍चित करण्यासाठी उभयतांमध्ये चर्चा होणार आहे.

शिवसेनेने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून भेटीला येण्याचे निमंत्रण दिले. ठाकरे यांच्या निमंत्रणानुसार राव हे रविवारी मुंबईत येणार असल्याची माहिती तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.
ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांना भोजनाचे निमंत्रण दिले आहे. राव यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या दडपशाहीविरोधात बिगर-भाजपशासित राज्यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. चंद्रशेखर राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनीही राव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच नवी दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा जाहीर केला आहे.

Exit mobile version