| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
तालुक्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु, रविवार (दि.17) मध्यरात्रीपासून वादळी वारे व मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. भातपिकाची लावणी योग्य वेळेत झाल्याने या पावसाचा भातपिकाला काही धोका नाही, असे शेतकर्यांनी सांगितले. तर श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी आपत्कालीन दुर्घटनेचा संभव असल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट करण्यात आलेली आहे आणि पोलीस अधिकारी व अंमलदार आपापल्या बीटमध्ये सतर्क गस्त करीत आहेत, असे सांगितले.
श्रीवर्धन तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून वादळी वारे तसेच मुसळधार पावसाने विद्युत वाहक तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. श्रीवर्धन दिघी तसेच श्रीवर्धन म्हसळा मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठल्याने काही काळ एसटी सेवा ठप्प झाली होती. पावसाची तीव्रता बघता स्थानिक प्रशासनाने महाविद्यालयं व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. इंटरनेट सेवा कोलमडल्याने शासकीय कार्यालय तसेच बँकांमध्ये शुकशुकाट होता. वीजपुरवठा खंडित झाल्याने आर्थिक फटका बसला तो झेरॉक्स चालक व आईस्क्रीम पार्लर चालकांना. सुदैवाने आपत्तीजनक परिस्थिती तसेच जीवितहानी झालेली नाही.







