| दहिसर | प्रतिनिधी |
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. मात्र, या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. दहिसरमध्ये उत्तर भारतीयांनी मराठी आदिवासी कुटुंबाच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली आहे. आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शिवसेना (शिंदे गट)च्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी स्थानिक रहिवासी विजय पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला घरात घुसून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रोजी संध्याकाळी सुमारे 6.30 वाजता विजय पाटील (31) हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे आणि त्यांचा भाऊ प्रशांत हे घरी होते. त्यावेळी सूरज पांडे आणि सूरज यादव हे दोघे परवानगी न घेता घरात घुसले आणि निवडणूक प्रचार सुरू केला. पाटील यांनी याला आक्षेप घेऊन घरातून बाहेर जाण्यास सांगितले असता, आरोपींनी फोन करून त्यांच्या 8-10 सहकाऱ्यांना बोलावून घेतले. यानंतर अजय मौर्या, दशरथ पाल, राकेश यादव, दिनानाथ यादव, सभय यादव, पप्पू यादव, मेहिलाल यादव, नीलम पांडे आदींनी पाटील बंधूंना घराबाहेर ओढून मारहाण केली. राकेश यादव याने बांबूने हल्ला केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी पाटील यांच्या पत्नीला धमक्या दिल्या आणि अश्लील भाषा वापरल्याचा आरोप आहे. ही घटना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा राम यादव यांच्या प्रचार फेरी दरम्यान घडली असून, वॉर्ड क्रमांक 1 मधील विठ्ठलवाडी सोसायटी परिसरात ही मारहाण झाली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.







