महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही-देवेंद्र फडणवीस

। नागपूर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेले गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच सांगलीच्या जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव आता केलेला नाही तर तो 2012 मधला आहे. आपण त्या गावांना पाणी देण्यासाठी आधीच म्हैसाळच्या सुधारित योजनेत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळे तिथल्या 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे.

याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई यांनी म्हटलं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Exit mobile version