रोह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शेकापमध्ये जाहीर प्रवेश
। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील मेढा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती लक्ष्मण महाले व माजी जि.प. सदस्य नंदकुमार म्हात्रे यांनी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले की, आम्ही आमिषाने नाही तर प्रेमाने पक्षात प्रवेश करून घेतो. जनतेला सदासर्वकाळ फसवता येत नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार धैर्यशील पाटील, जि.प. सदस्य रमेश मोरे, अस्लम राऊत, गणेश मढवी, तालुका चिटणीस राजेश सानप, अनंत पाटील, जीवन पाटील, संजय म्हात्रे, हेमंत ठाकूर, प्रसाद भोईर, श्रेयसी गांगल, गुलाब वाघमारे, कांचन माळी यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आज नंदूशेठ व महाले यांनी शेकापमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात परिवर्तन निश्चित आहे.शेकापक्षातील प्रत्येक कार्यकर्ता माझ्या घरातील सदस्य आहे.गद्दारी, फसवणूक आमच्या पक्षात नाही. सत्तेच्या विरोधात राहून काम करण्याची धमक शेकापमध्ये आहे.आमचा कोणीही शत्रू नाही; पण फसवणूक करणार्याना सोडणार नाही. रोहा तालुक्यात आता परिवर्तन अटळ आहे. कारण, जनतेला सातत्याने फसवता येत नाही, असे सांगत शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी आगामी राजकारणाचे संकेत देत विरोधकांना गर्भित इशारा दिला आहे.
पक्षासाठी गेली अनेक वर्षे संघर्ष करत प्रामाणिकपणे काम करूनदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुय्यम स्थान देण्यात येत असल्याने शेकापमध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश करत असल्याचे लक्ष्मण महाले व नंदकुमार म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. रोहा तालुक्यातील यशवंतखार व मेढा विभागातील लक्ष्मण महाले व नंदकुमार म्हात्रे यांनी शेकापमध्ये प्रवेश केल्याने भातसई व मेढा विभागात शेकापची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे मत शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी यांनी व्यक्त केले आहे.
शेकापक्षातील प्रत्येक कार्यकर्ता माझ्या घरातील सदस्य आहे. गद्दारी, फसवणूक आमच्या पक्षात नाही. सत्तेच्या विरोधात राहून काम करण्याची धमक शेकापमध्ये आहे. आमचा कोणीही शत्रू नाही; पण फसवणूक करणार्यांना सोडणार नाही. रोहा तालुक्यात आता परिवर्तन अटळ आहे. – आ. जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस
योग्य वेळी सर्व काही सांगेन!
माझ्याबाबत बोलत असताना 1984 पूर्वी आपण काय करत होतात, हे सांगण्याची वेळ येऊ देऊ नका, असे सांगत थेट खा. सुनील तटकरे यांनाच नंदूशेठ म्हात्रे यांनी इशारा दिला असून, योग्य वेळी सर्व काही सांगेन, असे सांगितले आहे