बायपास सुरू करण्याचे पून्हा आश्वासन
कोकणवासीयांत संतापाची लाट
| माणगाव | सलीम शेख |
“यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी माणगाव बायपास सुरू होईल”, अशी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत केलेल्या या घोषणेनंतर कोकणवासीयांमध्ये आनंदापेक्षा तीव्र संताप, अविश्वास आणि नाराजीची लाट उसळली आहे. कारण गेली सतरा वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि माणगाव-इंदापूर बायपासबाबत अशीच आश्वासने दिली जात आहेत. परंतु, प्रत्यक्षात मात्र प्रत्येक वर्षी कोकणवासीयांच्या वाट्याला केवळ अपूर्ण कामे, धुळीचे लोट, जीवघेणे खड्डे आणि अंतहीन वाहतूक कोंडी हेच आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी काम पूर्ण होण्याच्या तारखा जाहीर केल्या. “यावर्षी”, “या पावसाळ्यानंतर”, “या गणेशोत्सवापूर्वी” अशी अनेक आश्वासने देण्यात आली. परंतु, प्रत्येक वर्षी ही आश्वासने पावसाच्या पाण्यात वाहून गेली असून, महामार्गावरील खड्ड्यांमध्ये गाडली गेली, अशी संतप्त भावना कोकणवासीय व्यक्त करत आहेत. गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी केवळ सण नसून भावनांचा उत्सव आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो चाकरमानी आपल्या मातीत परततात. मात्र, त्यांच्या स्वागताला तासन्तास वाहतूक कोंडी, उखडलेले रस्ते, खोल खड्डे आणि अपूर्ण बायपास असतो. अनेकदा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो. यंदाही माणगाव बायपास सुरू करण्याची घोषणा झाली असली, तरी माणगाव रेल्वे क्रॉसिंगवरील ओव्हरब्रिजचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. स्थानिकांच्या मते, हा पूल पूर्ण झाल्याशिवाय बायपास सुरळीतपणे सुरू होणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे सरकारच्या नव्या घोषणेकडे नागरिक “आणखी एक फसवे आश्वासन” म्हणूनच पाहत आहेत.
त्यामुळे कोकणवासीयांचा संताप आता केवळ महामार्गापुरता मर्यादित राहिलेला नाही. 17 वर्षांच्या विलंबामुळे हजारो अपघात, शेकडो निष्पाप जीवांचा बळी, वाहनांचे आर्थिक नुकसान, वाढलेला प्रवासाचा वेळ आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याची भावना जनतेत आहे. विकासाच्या नावाखाली वारंवार आश्वासने दिली गेली; मात्र, प्रत्यक्षात विकासाची गती कासवापेक्षाही मंद राहिल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे “जर बायपास खरोखरच सुरू होणार असेल, तर ओव्हरब्रिज अपूर्ण असताना वाहतूक कशी सुरू करणार?” असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे घोषणांवर विश्वास ठेवण्याऐवजी प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यावरच त्यावर विश्वास ठेवू, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
यंदाही कोकणवासीयांचा खड्ड्यातूनच प्रवास
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणाच्या विकासाचा जीवनमार्ग मानला जातो. परंतु, गेल्या 17 वर्षांत तो विकासाचा नव्हे, तर विलंब, निष्काळजीपणा आणि अपूर्ण आश्वासनांचे प्रतीक बनला आहे. यंदाच्याही गणेशोत्सवात लाखो कोकणवासीयांना पुन्हा वाहतूक कोंडी, महामार्गावरील खड्डे आणि रखडलेल्या कामांच्या विळख्यातूनच प्रवास करावा लागणार, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे “आता घोषणा नकोत, पूर्ण झालेला महामार्ग द्या; तारीख नको, प्रत्यक्ष बायपास सुरू करून दाखवा,” अशी आर्त पण संतप्त हाक संपूर्ण कोकणातून उमटत आहे. आता जनतेचा संयम संपत चालला असून, प्रत्यक्ष कृतीचीच कोकणवासीयांना अपेक्षा आहे. अन्यथा, या फसव्या आश्वासनांची राजकीय किंमत भविष्यात संबंधित सरकार आणि लोकप्रतिनिधींना मोजावी लागू शकते, अशी तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
